“मतं मागायला म्हणून जेव्हा ते येतील, तेव्हा आम्ही त्यांना म्हणू, ‘आधी पेन्शन द्या आम्हाला’.”
झारखंडच्या दुमका जिल्ह्यातल्या कुसुमदीह गावातल्या बुरुटोला पाड्यात आपल्या मातीच्या घराबाहेरच्या दत्तीवर (कट्ट्यावर) बसलेली लिताती मुर्मू बोलत असते.
“यावेळी आम्ही घरं आणि पेन्शन मागणार आहोत,” लितातीच्या शेजारीच बसलेली तिची शेजारीण आणि मैत्रीण शर्मिला हेमब्रॉम मधेच म्हणते.
पुढाऱ्यांचा उल्लेख करत ती गमतीने म्हणते, “याच वेळी ते येतात.’’ निवडणुकीच्या आधी जेव्हा ते इथे येतात, तेव्हा साधारणपणे गावातल्या लोकांना पैसे वाटतात. “ते (राजकीय पक्ष) आम्हाला १००० रुपये देतात, ५०० पुरुषांना आणि ५०० आम्हाला!’’ शर्मिला सांगते.
या दोघीही सरकारी योजना आणि लाभांपासून वंचित आहेत. त्यामुळे या दोन महिलांच्या लेखी या पैशाला किंमत आहे. लितातीच्या पतीचं २०२२ साली अचानक निधन झालं आणि २०२३ मध्ये एका महिन्याच्या आजारानंतर शर्मिलाचा पती वारला. कामासाठी बाहेर पडताना आम्ही एकमेकींसाठी असतो, हाच मोठा दिलासा असल्याचं या शोकाकुल महिला सांगतात.
पती वारल्यानंतर लिताती आणि शर्मिला यांनी विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. सर्वजन पेन्शन योजनेअंतर्गत १८ वर्षांवरील विधवा १,००० रुपये मासिक पेन्शनसाठी पात्र आहेत. पण निराशाच पदरी पडली. लिताती सांगते, “आम्ही बरेच फॉर्म भरले आणि मुखिया (सरपंच) कडेही गेलो, पण आम्हाला काहीही मिळालं नाही.’’












