“मोठ्ठा आवाज झाला, धडाऽम्! त्यापाठोपाठ धुराचा लोट दिसला. मी त्या दिशेला धावलो. स्फोटात कारखान्याच्या काही भिंती धप्पाकन् कोसळल्या. काही क्षण सुन्न होऊन मी पाहतच होतो, इतक्यात त्या धुळ-धुराच्या गदारोळातून धावत येणारा लिंगासामी दिसला. तो उघडाच होता. अंगावरील कपडे पेटल्यानं लिंगासामीची कातडी खरपूस झालेली. तो पुटपुटत होता, “मी, मी मेलेलो नाही ना? अजून जिवंत आहे ना मी?’ आम्ही लगबगीनं त्याला दवाखान्यात न्यायची तयारी केली. लिंगासामीला अशा अवस्थेत टू व्हिलरवर बसायला जमेना, म्हणून आम्ही त्याला हातगाडीवर टाकलं. अन् हॉस्पिटल गाठलं.” अपघात घडून दोन दिवस उलटलेत, नि स्थानिक पत्रकार मोरेश्वरन तो प्रसंग सांगताहेत. ते शिवकाशीतील फटाका फॅक्टरीपासून पाच मिनिटांच्या अंतरावरच राहतात. या अपघाताचा दिवस होता - १ जुलै, २०२५.
माझी पावलं अपघातस्थळाकडे वळली. अशा सुन्न जागी मनातली धडधडही कर्कश्श वाटते. स्फोटानंतरची शांतता भेसूर भासते. तिथं वावरताना जणू कानठळ्यांनंतरची मंद शिटी कानांत घुमतेय. माझी नजर मुआवना करते. फटाका कारखान्याचं गेट बंद. फाटकाला कुलुप लटकलय. फॅक्टरीचं एक युनिट पुर्ण उध्वस्त झालंय. मी कच्च्या सडकेवर टु व्हिलर कशीबशी सावरत इथवर पोहोचलोय. हॉस्पिटल अशा अडनिड्या, अपघातप्रवण ठिकाणापासून २५ कि.मी. दूर असावं? का? मला प्रश्न पडला.




















