सात मुली, सहा गावे, पाच मातृभाषा, दोन खेळ पण खेळण्याची भाषा एकच!
वसंत शाळेच्या निवासी प्राथमिक शाळेच्या मैदानावर रंजन राठवा वय १२ वर्ष, ज्योती भिल ११ वर्ष, शर्मिला धायकी ९ वर्ष, किंजल नायका १० वर्ष आणि निरल राठवा १० वर्ष हे सगळे खेळात मग्न आहेत. ही शाळा गुजरातमधील छोटाउदेपूर जिल्ह्यातील तेजगड येथील आदिवासी गावातील कोरज हिल पायथ्याशी आहे.
अडको दडको दहीं दडुको श्रावण गाजे पिल्लू पांके...
हे गाणं गुजराती भाषेतील बडबड गीत किंवा निरर्थक यमक असणाऱ्या बडबड गीतांच्या एका मोठ्या संग्रहातील आहे, जे सबंध राज्यातली मुले वेगवेगळे खेळ खेळताना म्हणतात. विशेष गमतीची गोष्ट अशी आहे की या बडबड गीतामधील यमक खेळणाऱ्या कुठल्याच मुलाच्या मातृभाषेत नाही. पाच मुली त्यांच्या शाळेपासून ३० ते ५० किलोमीटरच्या परिघात असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबांशी, रथवी, धनकी, डुंगरा भिली, नायकी यासारख्या त्यांच्या आदिवासी भाषांमध्येच बोलतात. परंतु आदिवासी अकादमीच्या या कॅम्पसमध्ये, जिथे त्यांची शाळा आणि वसतिगृहे आहेत, तिथे मात्र मुख्य प्रवाहातील गुजराती भाषा हीच त्यांची संवादाची भाषा बनली आहे.





