“माझं नाव तुलसीभाई नारानभाई. पण माझ्याकडे काही काम असलं तर फक्त ‘बच्चनला बोलवा’ एवढंच सांगा. इथे सगळे मला तसंच ओळखतात,” तुलसीभाई सांगतात.
अहमदाबादच्या गुलबाई टेकरा या वस्तीजवळच्या एका फूटपाथवर साठीचे तुलसीभाई आपल्या मुलासोबत, तानुभाईसोबत राहतात. तानुभाईचा जन्म झाला आणि त्यांची पत्नी वारली. “मला माझ्या आजीने मोठं केलं. तिची शंभरी पार झालीये. अजून जिवंत आहे,” तिशीतला तानुभाई सांगतो.
हे बाप-लेक सकाळी नऊ ते रात्री नऊ भंगार गोळा करायचं काम करतात. आणि गोळा झालेलं भंगार शहरातल्या मेमनगर तालुक्यातल्या भंगारवाल्याला विकतात.
मी त्यांना भेटले त्या दिवशी दुपारी दोन वाजल्यापासून ते वेचायला गेले होते. चार किलो प्लास्टिकच्या बाटल्या आणि किलोभर पुठ्ठा त्यांनी गोळा केला होता. त्याचे त्यांना भंगारवाल्याने ११० रुपये दिले. “या वर्षी उन्हाळा लईच तापलाय,” तुलसीभाई सांगतात. “आजारी पडायची वेळ आलीये. गोळा केलेला पुठ्ठा पंख्यासारखा वापरतोय दुपारी.”






