पारीवरचा मजकूर १५ भाषांमध्ये प्रकाशित होतोः आसामी, बंगाली, छत्तीसगडी, भोजपुरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि ऊर्दू. तुम्ही यातल्या कोणत्याही भाषेत पारीवरील लेखन वाचू शकता. शिवाय, पारीची संपूर्ण वेबसाइट हिंदी, बंगाली, मराठी, ऊर्दू आणि ओडिया या पाच भाषांमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच, साइटवरचा बहुतेक सगळा मजकूर आणि दुवे देखील त्या त्या भाषेत आहेत.
माध्यमक्षेत्रातल्या बड्या कंपन्या अगदी ४० भाषांमध्येही काम करतात हे खरं आहे. पण त्यामध्ये सगळ्या भाषांना सारखं माप दिलं जात नाही. उदा. त्यांच्या इंग्रजी साइटच्या तुलनेत त्यातला अगदी मोजकाच मजकूर भारतीय भाषांच्या साइटवर आढळून येतो.
प्रत्येक भारतीय भाषा ही तुमची स्वतःची भाषा आहे हे पारीच्या कामाचं सूत्र आहे. आणि यातही सर्व भाषांमध्ये समानता अभिप्रेत आहे. कुठल्याही एका भाषेत प्रकाशित झालेला लेख सर्व १५ भाषांमध्ये प्रकाशित करणं आमचं काम आहे. आणि पारीवरती यापुढे कितीही भाषांची भर पडली तरी यात तसूभरही फरक पडणार नाही. उत्तम अनुवादकांच्या चमूशिवाय हे करणं शक्य नाही. आजवर आमच्यासोबत १७० हून अधिक अनुवादकांनी काम केलं आहे आणि यातले किमान ४० तरी प्रत्येक महिन्यात अनुवादाचं काम करत असतात. आणि आम्ही केवळ भारतीय भाषांमध्ये अनुवाद करत नाही, तर मूळ या भाषांमध्ये लिहिलेला मजकूर पारीवर प्रकाशित व्हावा यासाठीही प्रयत्न करतो.
भारतीय भाषांना पाठबळ देणं आज कधी नव्हे तितकं महत्त्वाचं झालं आहे. कोस कोस पर बदले पानी, चार कोस पे वाणी या एका म्हणीतून भाषांच्या बाबत आपला देश किती श्रीमंत आहे ते समजून येतं.
पण आज केवळ या श्रीमंतीचे गोडवे गाऊन चालणार नाहीये. ८०० हून अधिक भाषा बोलल्या जाणाऱ्या आपल्या देशात गेल्या ५० वर्षांत २२५ हून अधिक भाषा लुप्त झाल्या असल्याचं पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया सांगतो. इतकंच नाही तर हे शतक सरेपर्यंत जगभरातल्या ९०-९५ टक्के बोली भाषा विस्मृतीत गेल्या असतील किंवा त्या टिकणं अतिशय कठीण असेल असं संयुक्त राष्ट्रसंघाचं मत आहे. अख्ख्या जगाचा विचार केली तर अगदी दर पंधरवड्याला एक आदिम भाषा लुप्त होत असताना आपण फक्त पाहत राहून चालणार नाही.
पारीच्या भाषाविश्वात तुमचं मनापासून स्वागत आहे.


