“या मोटरबाइकचा स्पीड ताशी ३० कि.मी., पण जेमतेम २७च्या स्पीडनंही ही गाडी पळत नाही.”
फास्ट पळणारी नसली, तरी आपल्याजवळ एक तिचाकी आहे, यासाठी ३४ वर्षीय वसीम उप्परवाल्याचा शुकर मानतो. हे वाहन आहे, म्हणूनच वसिम पुन्हा कामांसाठी घराबाहेर पडू लागला. एरवी त्यानं स्वत:ला कोंडून घेतलेलं.
वसीम तिचाकीवर स्वार होतो. स्टार्टर मारतो नि माझ्याकडे वळून गाडीच्या वायरिंगची समस्या सांगतो. त्याच्या मते वायरिंग नि बॅटरीत बिघाड आहे, त्यामुळं गाडीच्या ब्रेक्सवर लक्ष ठेवावं लागतं. तिचाकीतलं त्याचं आसन तसं आरामशीर, त्यावर बसून तो सीटखालची बॅटरी व सामान ठेवायची डिक्की दाखवतो.
मग तो हलकेच एक्सलेटर पिळतो. गाडी रस्त्याला लागते. हरियाणातील मंडीखेडा हे वसीमचं गाव. इथून साधारण अर्धा कि.मी. अंतरावरच त्याचं मोबाइल रिपेअरिंग शॉप. गाडी त्या दिशेनं डकाव डकाव धावते. दिल्ली-अलवार हायवेलगतची झाडं, नि त्यामागे वसीमचं दुकान. वसीम दुकानापर्यंत पोहोचेपर्यंत रस्त्यावरची उनाड पोरं गाडीचा पिछा करतात. धावत धावत हसतात-खिदळतात. कदाचित त्यांना या तिचाकीमागील डिक्कीची गंमत वाटत असावी. वसीमही पोरांच्या थट्टेला हसूनच प्रतिसाद देतो. दिव्यांगांची टर उडवण्याचे प्रकार अगणित. त्यातलाच हा एक असावा. पण वसीम पोरांचं वागणं हसण्यावारी नेतो.












