“एथे रोटी काथ मिल्दी है, चित्ता सारेआम मिल्दा है [इथे खायला मिळायची मुश्किल; हेरॉईन मात्र कधीही कुठेही अगदी सहज मिळतंय].’’
या हरवंस कौर. यांचा एकुलता एक मुलगा अंमली पदार्थांच्या आहारी गेलाय. “आम्ही खूप प्रयत्न करतो त्याला रोखण्याचा, पण तो आमच्याशी भांडतो, पैसे उचलतो आणि अंमली पदार्थांवर उधळतो,’’ नुकत्याच बाप झालेल्या त्या २५ वर्षीय तरुणाची आई सांगत असते. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गावात चिट्टा (हेरोईन) आणि इंजेक्शन व कॅप्सूलच्या स्वरूपातले मादक अंमली पदार्थ अगदी सहज मिळतात.
“जर ठरवलं तर सरकार अंमली पदार्थांचा गैरवापर अगदी नक्की थांबवू शकतं. आणि नाही; तर आपली आणखी आणखी मुलं याला हकनाक बळी पडत जातील.’’ राओके कलान गावातल्या बटाटा साठवण केंद्रात या हरवंस कौर रोजंदारीवर मजूर म्हणून राबतात. प्रत्येक पोत्याच्या पॅकिंगमागे त्यांना १५ रुपये मिळतात. दिवसाला त्या साधारण १२ पोती बांधतात. त्यातून दिवसाकाठी १८० रुपये त्यांच्या पदरात पडतात. ४५ वर्षीय सुखदेव सिंग हे त्यांचे पती. त्यांच्या नांगल गावापासून चार किलोमीटरहून थोडं आणखी पुढे गेलं की निहाल सिंग वाला लागतं. तिथल्या एका गोदामात सुखदेव सिंग रोजंदारीवर काम करतात. त्यांचं कामही गहू किंवा तांदळाची पोती बांधायचं. काम उपलब्ध असलं तर दिवसभर राबून ३०० रुपये मिळतात त्यांना. अख्खं कुटुंब या एवढ्याच कमाईवर जगतं.
पंजाबच्या मोगा जिल्ह्यातल्या याच गावची त्यांची शेजारीण म्हणजे किरण कौर. त्या थेट मुद्द्यावर येत म्हणतात, “आमच्या गावातून अंमली पदार्थांचा समूळ नायनाट करण्याचा शब्द जे कुणी आम्हाला देईल, त्यालाच आमचं मत!’’
किरणच्या स्पष्टवक्तेपणाचा संबंध थेटपणे तिचा पतीदेखील व्यसनी असण्याशी जोडलेला आहे, ही निःसंशय. किरणच्या पोटी दोन लेकरं आहेत- तीन वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांचा मुलगा. किरण म्हणतात, “माझे पती रोजंदारीवर राबायला जातात. त्यांना अंमली पदार्थांचं व्यसन लागलंय. गेल्या तीन वर्षांपासून जे काही कमावतायत, ते सगळं व्यसनात वाहून जातंय.’’
हिच्या कुटुंबात आठ लोक. घराच्या भिंतींना पडलेल्या मोठाल्या भेगा न्याहाळत त्या म्हणतात, “दुरुस्तीसाठी पैसे येणार कुठून?’’









