मी एस. कीर्ती, तेनकासी जिल्ह्यातील गव्हर्नमेंट मॉडेल शाळेची बारावीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेमुळेच मला फोटोग्राफीच्या वर्षभर चालणाऱ्या कार्यशाळेत भाग घेण्याची संधी मिळाली. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तोपर्यंत मला वाटायचं की फोटो फक्त लग्न आणि मोठ्या कार्यक्रमांमध्येच काढले जातात. मला पहिल्यांदाच समजलं की आमच्यासारख्या कामगार माणसांची आयुष्यं आणि संघर्ष छायाचित्रांच्या माध्यमातून नोंदवला जाऊ शकतो. ते आम्हाला सन्मानाने चित्रबद्ध करू शकतात.
एके दिवशी कार्यशाळेच्या संवादकांनी मला कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाविषयी सांगितलं आणि माझ्या हातात एक कॅमेरा दिला. पुढचे तीन दिवस मी वेगवेगळी आयुष्यं कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करणार होते. हरवून गेले होते मी. पहिल्या दिवशी तर मला चित्रीकरण कसं करावं किंवा छायाचित्र माहितीपटाचा (फोटो डॉक्युमेंटरी) विषय काय असावा याबद्दल काहीच कल्पना नव्हती. “स्टोरी शोधण्यासाठी दुसरीकडे किंवा कुठेतरी लांब जाऊ नका. ती कायम तुमच्यासमोर घडत असते.” मला माझ्या प्रशिक्षकांचे शब्द आठवले.
मला कार्यशाळेत वाचलेली गोष्ट आठवली, माझ्या आईचं आयुष्य – दिव्याच्या खांबाखाली उजळलेलं. आणि मी माझ्या आईसोबत जाऊन तिचा संघर्ष समजून घेण्याचा आणि तिचं आयुष्य टिपण्याचा विचार केला. या काळात मी माझ्या आईशी खूप बोलले, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तिचं काम पाहिलं. या माहितीपटातून मला समजलं की माझी आई किती खडतर जीवन जगत होती! तिचं नाव एस. मुथुलक्ष्मी आहे आणि ती ४२ वर्षांची आहे. ती एक अतिशय धाडसी आणि शूर स्त्री आहे.
ती अशी व्यक्ती आहे जिनं आमच्यासाठी स्वतःच्या स्वप्नाला तिलांजली दिली. पूर्वी माझे वडील गावात एक छोटंसं दुकान चालवायचे. वडील त्यांच्या तरुणपणात कामाच्या शोधात बाहेर जायचे. मग माझ्या आजीनं २००० रुपये उधार घेतले आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या जागेत दुकान सुरू करण्यासाठी दिले. त्यांच्या सायकलवरून ते जवळच्या गावात माल आणण्यासाठी जायचे आणि काम सुरू करायचे. ही गोष्ट आहे १९९७ मधली.
साल २०१६ मधल्या एका घटनेनं आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. माझी आई जवळच्या गावात जाऊन एमएस ऑफिस शिकत होती. दोन महिने झाले होते तिचा कोर्स सुरू होऊन आणि तिला कॉलेजमध्ये जाऊन बी.ए. (तमिळ) चं शिक्षण पूर्ण करायचं होतं. पण त्याच दरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. माझे वडील, भाऊ आणि माझा एक अपघात झाला. माझ्या वडिलांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि ऑपरेशन करावं लागणार होतं. माझ्या भावाला आणि मला पायांवर किरकोळ जखमा झाल्या. तेव्हा आईकडे वडिलांची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. पण नातेवाईकांकडून कर्ज घेऊन आणि तिचे काही दागिने गहाण ठेवून तिने कसेबसे ते तीन लाख रुपये उभे केले. पण या सगळ्याचा तिच्यावर जास्त भार पडणार होता.
आमच्या अपघातानंतर तिच्या स्वप्नांना पूर्णविराम मिळाला. ती याबद्दल कधीच काही बोलली नाही. कुटुंबावर प्रेम करणं हे तिचं कर्तव्य आहे असंच तिला नेहमी वाटायचं. ती नेहमी दृष्टीआड असायची. म्हणूनच मी तिचं आयुष्य टिपण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हा छायाचित्र लघुपट (फोटो डॉक्युमेंटरी) मी शाळेत सादर केला आणि चेन्नईतील प्रदर्शनासाठी तो निवडला गेला, तेव्हा माझ्या आई-वडिलांना माझा खूप अभिमान वाटला होता. माझ्या वडिलांना कायम फोटोग्राफी शिकायची होती. ते आता माझ्या फोटोग्राफीच्या प्रवासाबद्दल उत्सुक होते.
प्रदर्शनाच्या दालनात गेल्यावर मी पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे बॅनरवर माझ्या आईचा फोटो झळकत होता. मी भारावून गेले. अनेक कलाकार, पत्रकार आणि छायाचित्रकार, अगदी काही परदेशी लोकही प्रदर्शनाला भेट देत होते. काहींनी माझ्याकडून पोस्टकार्डवर ऑटोग्राफ घेतली. इतरांनी माझ्या कामाबद्दल प्रोत्साहनपर गोष्टी सांगितल्या. पण माझ्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहण्यासाठी दोन माणसं येऊ शकली नव्हती, ते म्हणजे माझे आई-वडील. मला माहित होतं, जेव्हा आम्ही प्रदर्शनाची सांगता करत होतो, तेव्हा माझी आई हिशेब करण्यात आणि तिच्या आयुष्याचा गाडा पुढे रेटण्यात व्यस्त होती.
कॅमेरा हातात घेऊन मी माझ्या आईचा पहिला फोटो काढला. तो फोटो पाहून आईच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि ज्या भावना होत्या, त्या मला आजही आठवतात.
























