मिनोती मार्डी अगदी निसर्गरम्य परिसरात राहते, अजोय नदी तिच्या घराजवळून वाहते आणि कमळाच्या फुलाची तळ्यांच्या पलीकडे धावणारी ट्रेन तिला दिसते.
पण जन्मतःच पाठीचा कणा आणि पायांच्या हाडांचा क्षयरोग असलेली पाच वर्षांची मिनोती या सर्व गोष्टी दुरूनच पाहू शकायची. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील माहुला या गावी तिला चालणं किंवा हालचाल करणं अशक्य होतं.
“तिच्या पाठीच्या कण्याला चांगलाच बाक आला होता,” तिची आजी, जबा मार्डी सांगते. “तिला इतके कष्ट होत होते की ती जगेल असं काही आम्हाला वाटलं नव्हतं.”
पश्चिम बंगालमध्ये संथाल समाजाची लोकसंख्या राज्यातील आदिवासींच्या जवळजवळ निम्मी आहे. जवळजवळ सगळेच ग्रामीण भागात राहतात आणि स्थानिक दवापाण्यासाठी डॉक्टरांवर विसंबून असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांसारख्या (पीएचसी) आरोग्य सुविधांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या फारच अपुरी आहे (ग्रामीण आरोग्य सांख्यिकी २०२१-२२).
लहानग्या मिनोतीला श्वसनाच्या गंभीर समस्या येऊ लागल्या तेव्हा तिच्या कुटुंबाने तिला स्थानिक डॉक्टरांकडे नेलं. हा डॉक्टर खरा आहे का भोंदू ते काही त्यांना माहीत नव्हतं. बीरभूम जिल्ह्याच्या या दुर्गम भागात, असं काही माहीत करणंही अशक्य होतं. जबा सांगते की, त्यांना पात्र वैद्यकीय व्यावसायिक कुठे शोधायचे याचीदेखील माहिती नव्हती.


