“सरकार, वॉचमनसाहेब पाणी पियाला द्या,” पिण्याच्या पाण्यासाठी गंगुबाईला अशा विनवण्या अगदी रोज कराव्या लागतात.
पण फक्त विनवण्याही पुरत नाहीत. तिला पटवून द्यावं लागतं, “मी रहिवासी आहे बापू, तुझं भांडं उचलत नाही.”
नांदेडच्या गोकुळनगर फुटपाथवर राहणाऱ्या गंगुबाई चव्हाण (नाव बदललं आहे) समोरच असलेल्या हॉटेलमध्ये पाणी मागायला जातात. खासगी नळ, चहाची टपरी, मंगल कार्यालयं अशा ठिकाणाहून पाणी मागून आणतात.
पाण्यासाठीची रोजची वणवण तितक्यावर थांबत नाही. फासेपारधी समाजाच्या गंगुबाईंच्या जातीवरचा ‘चोर’ हा ठपका १९५२ साली सरकारने पुसला तरी समाजमनातून तो अद्यापही पुसला गेलेला नाही. सत्तर वर्षांनंतरही ‘मी चोर नाही’ हे गंगुबाईला पटवून द्यावं लागतं. तेव्हा कुठे विनंती करून एखादा ड्रम पाणी मिळतं.
“‘तुझं किती तरी सामान आमच्यापुढे पडून राहतं, आम्ही उचलत नाही’ असं म्हटलं तर लोक पाणी देतात,” गंगुबाई सांगते. लहान लहान प्लॅस्टिकचे ड्रम, बाटल्यांमधून मिळेल तितकं पाणी आणायचं. एका हॉटेलमधून पाणी नाही भेटलं तर दुसऱ्या हॉटेलमधून. अशा पद्धतीने चार पाच ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यावेळी हॉटेल मालक, घरगुती नळ मालक हाकलून लावतात, अपमानास्पद बोलतात. तरीही पाण्यासाठी विनविण्या थांबत नाहीत.
















