मेरठमधल्या कॅरम बोर्ड बनवणाऱ्या कारखान्यात पाच कारागीर सलग पाच दिवस प्रत्येकी आठ तास काम करतात तेव्हा कुठे ४० बोर्डांचा एक संच तयार होतो. स्ट्रायकर आणि सोंगट्या कॅरमवर सुरळीत सरकाव्यात म्हणून काय काय करायला लागतं, याची जाण इथल्या प्रत्येक कारागिराला असते. कॅरमचा खेळ जास्तीत जास्त चार जण खेळू शकतात; पण इथे एक-एक कॅरम बोर्ड तयार करण्यासाठी पाच-पाच कारागीर राबत असतात. कॅरम बोर्ड तयार करण्यासाठी राबणाऱ्या या हातांनी स्वतः मात्र हा खेळ कधीच खेळलेला नाही.
मदन पाल ६२ वर्षांचे. ते म्हणतात, “साधारण १९८१ सालापासून मी कॅरम बोर्ड बनवतोय. पण आजवर ना मी कधी विकत घेतलाय; ना कधी खेळलोय. वेळ आहेच कुणाकडे?” आमच्याशी बोलत असतानाही ते आणि त्यांचे सहकारी बाभळीच्या लाकडाच्या कापलेल्या पट्ट्या निगुतीने रचण्यात गुंतलेले असतात. एकूण पट्ट्या असतात २,४००. प्रत्येक पट्टीची लांबी ३२ किंवा ३६ इंच. कारखान्यातल्या वर्कशॉपच्या बाहेरच्या भिंतीला लागूनच असलेल्या गल्लीत या पट्ट्या एकामागोमाग एक नीट मांडल्या जात असतात.
“सकाळी साधारण पावणेनऊपर्यंत मी इथे पोहोचतो आणि नऊ वाजता काम सुरू करतो. घरी परतायला संध्याकाळचे सात-साडेसात वाजतात,” मदन पाल सांगत असतात. कॅरम बोर्ड बनवण्याच्या एका लहानशा कारखान्यात ते कामाला आहेत. हा कारखाना उत्तर प्रदेशमधल्या मेरठ शहरातल्या सूरजकुंड स्पोर्ट्स कॉलनीत आहे.
मदन हे मेरठ जिल्ह्यातल्या पुठ्ठा गावचे. आठवड्यातून सहा दिवस सकाळी सात वाजता ते गावातून निघतात आणि सायकल मारत १६ किलोमीटर प्रवास करून आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचतात.
मेरठ शहरातल्या तारापुरी आणि इस्लामाबाद भागात लाकडाच्या वखारी आहेत. कापलेली लाकडं तिथून छोटा हत्तीत (मिनी टेम्पो ट्रक) भरून आणली जातात. नुकतेच दोनजण तशा लाकडाच्या पट्ट्या इथे उतरवून गेलेत.
“या लाकडी पट्ट्यांपासून कॅरम बोर्डची बाहेरची चौकट तयार केली जाते. पण आधी त्या चार ते सहा महिने मोकळ्या हवेत वाळवण्यासाठी ठेवाव्या लागतात. हवा आणि ऊन लागलं की या पट्ट्यांमधला सगळा ओलावा निघून जातो, त्या सरळ राहतात आणि त्यांना बुरशीही लागत नाही,” मदन सांगतात.



























