अचानक भयंकरच काहीतरी घडलं… एक माकड कुठूनसं आलं... कुणाला काही कळायच्या आत जवळ जवळ हिसकावलंच की त्याने चंपा वट्टीचं तान्हं बाळ! तशी ती नेहमीसारखीच आपल्या राजपूर गावालगतच्या जंगलात गेली होती. मोह, साळ बिया गोळा करायच्या आणि आठवडी बाजारात विकायच्या असं काहीसं तिच्या डोक्यात. जंगलात खाली जमिनीवर पडलेल्या बिया गोळा करत असताना या आईने आपल्या तान्ह्या बाळाला पाठुंगळी घेतलं होतं.
“काम करताना फार नाही; अगदी क्षणभरच मी बाळाला जमिनीवर ठेवलं होतं,” ती सांगत असते, “आणि काय सांगू, झडप घालून बाळ उचलून नेऊ पाहणारं एक माकड माझ्या नजरेस पडलं.” तेव्हापासून जंगलात वावरताना आपल्या तान्ह्या लेकराच्या सुरक्षिततेची चिंता बोकांडीच असायची तिच्या!
पण आता ती निर्धास्त झालीय. बाळाला आपल्यासोबत जंगलात नेणं हे आता तिला अत्यावश्यक वाटत नाही. छत्तीसगडच्या गावखेड्यातल्या चंपासारख्या बायका आता आपल्या लेकरांना जवळच्या पाळणाघरात किंवा लैका घरात सोडून पोटापाण्याच्या कामाला जाऊ शकतात. सात महिन्यांपासून तीन वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी ही पाळणाघरं चालवली जातात.


















