ती सुकलेल्या गवताच्या एका मोठ्या गठ्ठ्यावर बसलीये, तिच्या आसपास नजर टाकली तर तो सगळा परिसर उजाड झालेला दिसतो. तुटलेल्या बांबूच्या काठ्या, फाटलेल्या ताडपत्री, प्लायवूडच्या फळ्या, दोरीचे तुकडे, चुरगळलेल्या साड्या, घरातली वापरायची भांडी, मातीनं माखलेले कपडे आणि रोजच्या वापरातल्या इतर वस्तू हे सगळं अस्ताव्यस्त पडलंय. हे त्यांचं घर होतं म्हणे. म्हणजे ते अजूनही आहे. पण काही दिवसांपूर्वी दिल्ली विकास प्राधिकरणाच्या बुलडोझरने त्यांच्या ह्या झोपड्या तोडल्यामुळे त्या अशा दिसत होत्या. चिल्ला सरोदा खादर या जनगणना नगरातल्या या वस्तीतल्या १०-१५ झोपड्यांपैकी एक झोपडी रिता देवीची होती जिच्यावर बुलडोझर चालवलं गेलं.
तिच्या चेहऱ्यावर तसे चिंतेचे भाव नाहीये. तिनं एका हातात एक इंच रुंद असलेलं तपकिरी रंगाचं सपाट गवताचं पान धरलंय आणि दुसऱ्या हातातल्या विळ्याने ते दोन किंवा तीन पातळ पट्ट्यांमध्ये कापतेय. दाराशी येणारा बुलडोझर तिच्यासाठी किंवा यमुनेच्या पात्राजवळच्या त्या वस्तीतल्या कुणासाठीही नवीन नाही आणि त्यांना त्याची भीतीही वाटत नाही. दिल्ली सरकार इथं जैवविविधता उद्यान विकसित करण्याचं नियोजन करतंय. ही “जमीनच सरकारी आहे, म्हणून तर ते आमच्या झोपड्या तोडतात, फक्त शेती करणारे लोक ही जमीन वर्षभरासाठी भाडेपट्ट्यावर घेतात.”
“आम्ही अक्षरधामजवळ रहायचो तेव्हाही हीच गत होती,” रिता म्हणते. “एक दिवस कोणीतरी मासे साफ करत होतं. एका कावळ्यानं त्यातला कचऱ्यात टाकलेला मासा उचलला अन् मंदिरात नेऊन टाकला. मग काय त्यांनी सगळी वस्तीच उठवली. ही २०१५ ची घटना आहे. तिथून मग आम्ही चिल्ला खादरच्या भागात रहायला आलो. इथं पण असं चार-पाच वेळा घडलं. तरीपण आम्ही इथंच राहतो.” त्यांनी भाड्यानं घेतलेल्या जमिनीवर ८ बाय १० ची एक खोली बांधलीये. जिचं महिन्याला ५०० रुपये भाडं आहे.
“आम्ही राजवीर नावाच्या एका गुज्जर माणसाला भाडं देतो. तो चिल्लामध्येच राहतो. ही जमीन त्याच्या आजोबांनी आधीच सरकारला विकली होती. त्यांना त्याची भरपाई मिळाली होती. पण तो अजूनही या जमिनीचा मालक असल्याचा दावा करतो. आमच्यासारख्या गरिबांना तो मारहाण करतो, आम्हाला धमकावतो आणि पैसेही उकळतो,” रिता म्हणते. “तुझं शेत, तुझी जमीन, खरं काय ते तुलाच माहित बाबा! आम्हाला तर काय रहायला जागा मिळाल्याशी मतलब. आम्ही कधीच पक्कं घर बांधत नाही. प्रत्येकवेळी घर पाडल्यावर ते बांधायचं कसं?,” ती कापलेल्या गवताच्या पट्ट्यांचा एक लहान गठ्ठा बांधताना बोलत होती.
रिताच्या कुंबियांनी आताच झालेल्या पाडकाम मोहिमेनंतर, त्यांच्या झोपडीच्या दोन्ही बाजूंच्या भिंती आणि प्लास्टिकचं छत परत बांधलंय. या वस्तीत राहणारे बरेच लोक उत्तर प्रदेश आणि बिहारमधून रोजंदारीसाठी स्थलांतरित झालेत. रिता बिहारच्या सुपौल जिल्ह्यातली आहे. १९९३ मध्ये तिचे आईवडील पोटापाण्याच्या शोधात बास्पती गावातून दिल्लीला स्थलांतरित झाले. तेव्हापासून ती दिल्लीतच राहते. २०२१ च्या जनगणनेनुसार, बिहारमधील सुमारे ९३ लाख लोक त्याच कारणानं इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालेत. रिता ही मल्लाह या मासेमार समुदायाची आहे, ज्याला निषाद आणि धिमार म्हणूनही ओळखलं जातात, ज्यांना आता बिहारमध्ये अनुसूचित जाती म्हणूनही सूचीबद्ध केलं गेलंय.




















