जिथे परिस्थिती बिकट असते तिथेच पिकांमध्ये जास्तीत जास्त वैविध्य असतं असं डॉ. रंगलक्ष्मी म्हणतात. “तमिळ नाडूचा किनारी प्रदेश पहा. खासकरून कडलूर ते रामनादपुरम जिल्ह्यांचा भाग पहा. तिथे जमिनीची क्षारता जास्त आहे. मातीच्या विशेष गुणांमुळे तांदळाछ्या अगदी अनोख्या जाती तयार झाल्या आहेत. त्या वेगवेगळ्या कालावधीच्या आहेत. नागपट्टिणनम आणि वेदारण्यममधल्या पट्ट्यात कुळि वेदिचान नावाचा भात पिकतो. इतरही २० प्रकारचे वाण इथे घेतले जातात.”
“नागपट्टिणनम आणि पूंपुहारच्या पट्ट्यात कुळ्ळुरंदई नावाचा एक भात पिकवला जातो. इतरही अनेक स्थानिक प्रजातीही इथे घेतल्या जातात. त्या त्या प्रदेशातल्या पर्यावरणाशी सुसंगत शेती केली जात होती. या सगळ्या प्रजाती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे गेल्या आणि त्यांचं जतन झालं. पण आता तर बी बाजारातून विकत घेतलं जातं, त्यामुळे त्या वाचवण्याची, जतन करण्याची सवयच आता निघून गेली आहे.” त्यामुळे एकीकडे वातावरण बदलाचं आव्हान असताना “बी आणि विविध वाणांचं ज्ञान मात्र विरून जात आहे,” डॉ. रेंगलक्ष्मी सांगतात.
लेनिनच्या म्हणण्यानुसार जैवविविधतेची जोपासना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विविध प्रकारची पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनीच केली आहे. “यांत्रिक प्रक्रिया आणि मोठमोठ्या बाजारपेठांनी त्यांना कायम कमी लेखलं आहे. आजही कोरडवाहू क्षेत्रात येणारी पिकं आहेत आणि त्यांनाही वातावरण बदलाचा फटका बसतोय. नाचणी, तीळ, मूग, पावटा, वास, बाजरी, ज्वारी ही सगळं अत्यंत चांगली पिकं आहेत. पण आता सगळे शेतकरी यांत्रिकी शेतीमागे धावतायत. शेतीभोवती फिरणारी समाजरचनेची जागा जेव्हा ही यंत्रं घेतात तेव्हा ज्ञानाचा प्रचंड ऱ्हास होतो,” लेनिन सांगतो.
सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे कौशल्यांचा ऱ्हास. ही माहिती, हे कौशल्य आता लागत नाही हा एक भाग पण खरं तर हे कौशल्य किंवा ज्ञान आता मागास समजलं जातं हे जास्त वाईट आहे. “डोकं असलेला माणूस असलं काही करत बसणार नाही. हा समज इतका जास्त प्रबळ झालाय की अनेकांना समाजासमोर त्यांचं हे कौशल्य दाखवायचंच नाहीये,” लेनिन म्हणतो.
पण यावरही उपाय आहे. “मूळच्या याच प्रदेशात पिकत असलेल्या प्रजाती आपल्याला शोधून काढाव्या लागतील. त्यानंतर त्यांचं जतन करून त्या पुन्हा लागवडीखाली आणून आपल्या आहारात आणाव्या लागतील. हे करू. पण बाजारपेठ नावाचा जो राक्षस आहे त्याला गाडायचं असेल तर एकट्या तिरुवण्णमलाईमध्ये किमान एक हजार उद्यमी तयार व्हावे लागतील,” लेनिन म्हणतो.
“पुढच्या पाच वर्षात एक सहकारी संस्था सुरू करून समूहशेती सुरू करू शकेन अशी आशा आहे. तुम्हाला माहिती आहे का, गेल्या वर्षी पावसाच्या दिवसांची संख्या जास्त होती. आणि जवळपास चाळीस दिवस फारसं ऊनच पडलं नव्हतं. असं झालं तर भातं सुकणार कशी? आम्हाला ड्रायर किंवा सुकवण्यासाठी काही तरी सोय करावी लागेल. सामूहिकरित्या ते शक्य होईल.”
बदल होईल. त्याला खात्री आहे. त्याच्या स्वतःच्या आयुष्यात तरी होतोच आहे. जून महिन्यात त्याचं लग्न आहे. “राजकीय क्षेत्रात किंवा धोरणाच्या पातळीवर बदल हळूहळूच होणार. झटपट काहीही अंगलट येऊ शकतं.”
म्हणूनच लेनिनची आपल्या मित्रांच्या सोबतीने सुरू असलेली संथ, शांत क्रांती प्रत्यक्षात घडूनही येईल...कोण जाणो?
या संशोधन कार्यास अझीम प्रेमजी युनिवर्सिटीच्या २०२० सालच्या रिसर्च फंडिंग प्रोग्रामअंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.
टिपर हा एक प्रकारचा ट्रक असतो. त्याचा मागचा भाग वरती उचलला जातो आणि आतला माल खाली ओतता येतो.
शीर्षक छायाचित्र : कुळ्ळन्कार, करुदन संबा आणि करुणसीरग संबा या जातीचे भात. फोटो : एम. पलानी कुमार