“आमच्या समाजातल्या कुणी जर बांबूपासून परारा [वस्तू सुकवण्यासाठी वापरली जाणारी सपाट ताटली] किंवा सूप [उफणणीसाठी वापरली जाणारी टोपली] बनवलं तर मग त्यांना दुसऱ्या समुदायाला दंड द्यावा लागतो; धान्य आणि पैशाच्या स्वरूपात!” मंगलीबाई नियम समजावून सांगत असतात. मंगलीबाई या बिंझवार आदिवासी. बिंझवार आदिवासी हे बैगा आदिवासी समाजातल्या अनेक उपसमुदायांपैकी एक. बैगा ही मध्य प्रदेशातली एक आदिम (PVTG) जमात आहे. या बैगा जमातीत बिंझवार, नाहर, नरोटिया, भरोटिया, राय मैना आणि काठ मैना असे उपसमुदाय आहेत. त्यांचे उपजीविकेच्या संदर्भात खास नियम आहेत. मंगलीबाई त्याविषयीच सांगतायत, “बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो; आमच्यातला प्रत्येक समुदाय!”
मंगलीबाई या स्वतः बिंझवार बैगा आदिवासी. बालाघाट जिल्ह्यातल्या नाटा गावात पांडा टोला आहे. हा टोला म्हणजे १० ते १२ आदिवासी कुटुंबांची वस्ती. इथेच मंगलीबाई राहतात. शुक्रवारची सकाळ आहे आणि समुदायातल्या इतर काही लोकांसोबत मंगलीबाई बांबू आणायला निघाल्यात; मालधर गावाजवळच्या जंगलाच्या दिशेने! तशा नेहमी त्या पहाटे ४ वाजायच्या सुमाराला निघतात. पण आज माझ्यासाठी वाट पाहात थांबल्या होत्या. त्यामुळे जरा उशीर झालाय. तरीही सूर्योदय व्हायच्या आधीच जंगलाच्या वाटेने पावलं पडायला सुरुवात झालीय.
वाटेत नदीचं कोरडंठाक पात्र लागतं. सोबत आणलेले जेवणाचे डबे त्या या पात्रातल्या वाळूत दडवून ठेवतात. बरोबर फक्त पाण्याची बाटली आणि एक कुऱ्हाड घेऊन चालू लागतात. “आपल्यापाशी कमीत कमी वजन असायला हवं. त्यासाठीचा हा एक मार्ग!” मंगलीबाई म्हणतात. दुपारनंतर पुन्हा पांडा टोल्याकडे पायी परत जायचंय; ८ ते १० किलोमीटर! त्यावेळी त्यांच्या डोक्यावर साधारण २५ किलो वजनाचे तीन-चार बांबू असतील.






































