“अभ्यासात मन लाव. तू तुझ्या समाजातील इतर मुलांसाठी एक आदर्श बनू शकतोस.”
जितेंद्र शर्मा सरांनी संपूर्ण वर्गासमोर माझ्याबद्दल हे शब्द काढले तेव्हा मी बहुधा नववीत होतो. मी इतका भारावून गेलो होतो की तेव्हा माझ्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. मुसहर समाजातल्या एका मुलावर कोणीतरी इतका विश्वास दाखवण्याची ही पहिलीच वेळ होती. घरी चालत जातानाही त्यांचे शब्द माझ्या मनात सतत घुमत होते. “तू एक आदर्श बनू शकतोस...” मी स्वतःबद्दल असा विचार कधीच केला नव्हता.
कदाचित माझं शिक्षण हे फक्त माझ्यापुरतं मर्यादित नाही, हे मला त्या दिवशी पहिल्यांदाच समजलं. त्यामुळे माझ्या सभोवतालच्या इतरांनाही त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचे धैर्य मिळू शकेल. मी आणखी जोमाने अभ्यास करू लागलो. जेव्हा जेव्हा परिस्थिती माझ्या विरोधात गेली, तेव्हा तेव्हा मी माझा निर्धार ढळू न देण्यासाठी शर्मा सरांच्या शब्दांचा आधार घेतला. शिक्षकाचा एक शब्द माणसाला कुठवर घेऊन जाऊ शकतो! त्याने किती फरक पडतो! मला जाणीव झाली की शर्मा सरांना फक्त गणित कसे शिकवायचे एवढेच माहीत नव्हते, तर ते आपल्या विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमताही ओळखू शकत होते.
शिक्षक तुम्हाला फक्त पुस्तके वाचायला शिकवत नाही, तर एक चांगला शिक्षक तुम्हाला तुमची स्वप्ने वाचायला शिकवतो.
मी आशिष नंद, वय वर्षे २५, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील मंझवा गावचा रहिवासी. आम्ही मुसहर आहोत. माझ्या समाजाबद्दल लोक खूप काही ऐकतात, पण ते आम्हाला क्वचितच समजून घेतात. मुसहर हा शब्द उच्चारताच लोकांच्या डोळ्यांसमोर दारिद्र्य, अंगमेहनतीची मजुरीची कामं आणि वंचितांचे जिणे अशी चित्रे उभी राहतात. मला खात्री आहे की यात काही प्रमाणात तथ्य आहे. पिढ्यानपिढ्या आम्ही समाजातील सर्वात उपेक्षित घटकांपैकी एक राहिलो आहोत. उत्तर प्रदेशात आमचा समावेश अनुसूचित जातींच्या यादीत करण्यात आला आहे. आमच्या पूर्वजांकडेही कोणतीही जमीन नव्हती, ना स्थिर रोजगार होता ना उत्पन्न. आम्ही दलित आहोत. शिक्षण हा आमचा कधीच विशेषाधिकार नव्हता. गावातील काही गरीब ब्राह्मणांप्रमाणे ते आमच्या आयुष्याचा कधी भाग बनलेच नाही.










