लताबाईंना आणि त्यांच्या शहराला घनकचरा व्यवस्थापनासाठी पुरस्कार मिळाला, पण मूलभूत गरजांसाठी सातत्याने चाललेला लताबाईंचा संघर्ष वेगळीच कहाणी सांगतो
लताबाईंना आठवड्याला हक्काची एक दिवसाची सुट्टीही मिळत नाही. त्या प्रत्येक दिवस काम करतात. त्या आजारी पडल्या अन् त्यांनी रजा घेतली तर ज्या कंत्राटी कंपनीत त्या काम करतात, ती कंपनी त्यांना दिवसाला ५०० रुपये दंड आकारते.
आणि अशा या लताबाई लातूर शहराच्या पुरस्कार विजेत्या कचरावेचक आहेत.
‘पारी’शी बोलताना त्या म्हणाल्या, “लातूर शहरातली मी एकमेव महिला वाहनचालक आहे. मला नेमून दिलेल्या रहिवासी जागा स्वच्छ ठेवल्याबद्दल २०११ मध्ये लातूर महोत्सवात आमचे आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते मला लातूर भूषण पुरस्कार मिळाला.”
पुढे त्या सांगतात, “महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडच्या क्षेत्राची तपासणी केली, त्यांना सुका किंवा ओला कचरा कुठंच सापडला नाय. भल्या-मोठ्या जन समुदायासमोर, मंत्री आणि मान्यवर मंडळींसमोर पुरस्कार स्वीकारताना मला भारावून गेल्यासारखं झालं. मला वाटलं होतं, की माझा संघर्ष नंतर लक्षात घेतला जाईल – थोडा तरी. नंतर मला कळलं की हे फक्त यका दिवसासाठीच होतं.”
लताबाई रसाळ, वय वर्षे ४०. महाराष्ट्रातल्या लातूर शहरातल्या. त्या म्हणतात, “मी २००२ पासून लातूरमध्ये कचरा गोळा करतेय.” त्याच सालात त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांच्या लग्नाला अवघी सात वर्षं झाली होती अन् लग्नावेळी त्या फक्त १५ वर्षांच्या होत्या. स्वतःच्या आणि पाच मुलांच्या उदरनिर्वाहासाठी उपजीविकेचा मार्ग शोधत त्यांनी कचरा वेचण्याचं काम हाती घेतलं.
















