स्त्रिया व पुरुषांच्या गोंदण नक्षी एकसारख्याच नसत. वेगळ्या असत. महिला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगळी नक्षी गोंदून घेत – न्हान आल्यावर वेगळी नि लग्न झाल्यावर निराळी. काही बायका आपल्या नवऱ्यांच्या एखाद्या कर्तबगारीची आठवण म्हणूनही त्या त्या प्रसंगाची निशाणी गोंदूण घेत.
“कोन्याक बाईची जिंदगी वाटावळणांनी बदलत जाते. ती बापाच्या कुळात जन्म घेते, नि लग्नानंतर दुसऱ्या कुळात जाते. पण तिच्यासोबत असते लग्नापूर्वी तिनं गोंदूण घेतलेली निशाणी. ही निशाणीच आयुष्यभर तिची सोबत करते, अगदी मृत्यूनंतरही. ती गोंदण खूण सांगते ही कोण, कुठली, कोणाची. तिच्या आदीम कुळाचा ठसा कायम तिच्या अंगावरच राहतो.” एमो कोन्याक सांगते.
एमो मोन जिल्ह्यातली. इथलीच असल्यानं तिच्या स्मृतीपटलावरही आज्यापणज्यांची गोंदण नक्षी कोरलीये. “लहाणपणी अनेकदा मी गोंदवण्याच्या कहाण्या ऐकल्यात. कसं गोंदायचे, किती दुखायचं, तरीही गोंदून झाल्यावर कसं गौरवास्पद वाटायचं. असे किस्से लोककथांगत सांगितले जात. ते सांगणारांच्या हावभावात विस्मय नि आदर असे. माझ्यासाठी ही गोंदणं जणू आठवणीचे नकाशेच आहेत, हे गोंदण केवळ कातडीवर उमटत नव्हतं, तर तो वंशवेलीचं नामोनिशान नोंदणारा चित्रमय दस्तावेजच असे” पेशानं संशोधक असलेली ३२ वर्षीय एमो सांगते.
कोन्याक ही लढाऊ जमात. शत्रुंची मुंडकी छाटणं ही कोन्याकांची खूण. बऱ्याचदा युद्धांतील विजय साजरा करण्यासाठी निशाणी म्हणून कोन्याक् पुरूष गोंदूण घेत. या एकाच तथ्याला महत्त्व मिळालं. त्यामुळं कोन्याक गोंदणांवरील संशोधन व कथनात स्त्रियांना स्थानच मिळालेलं नाही. असं एमो मानते. तिला आपल्या आजीनं सांगितलेल्या गोंदणगोष्टी आठवतात. “आजी नेहमी सांगायची, गोंदूण घेणं किती वेदनादायक असे, कशी कातडी रक्तबंबाळ व्हायची, गोंदल्याजागी कशी सूज यायची, नि तरीही गोंदूण झाल्यावर कसा अभिमान वाटायचा, आपण अधिक सुंदर झालो या भावनेनं कसं मन पिसासारखं हलकं व्हायचं.”
याच गावात जवळच राहणारी ज्ञोंफे, आता वयाच्या सत्तरीत आहे. तिनंही गोंदणकला शिकून घेतली, ज्ञोंफेची थोरली बहिण व चुलत बहिणींनी तिला गोंदणं शिकवलं. ज्ञोंफेच्या बहिणींनी ही कला आपल्या आईकडून शिकलेली. इतक्या वाटावळणांनी ती ज्ञोंफेपर्यंत आली. पण ज्ञोंफेला स्वत; मात्र गोंदण नक्षी रेखायची संधी मिळाली नाही. कारण तो मान केवळ 'राणी'चा. 'आंघ'च्या (गावमुखियाच्या) प्रथम पत्नीचा. 'राणी' गोंदणकाम करे, तेव्हा तिच्या स्वयंपाकासाठी सरपण आणणं, स्वयंपाक करणं नि ज्यांच्यावर गोंदण केलं जायचं, त्यांना घट्ट धरून ठेवणं, ही मदतनिसाची जबाबदारी ज्ञोंफेनं निभावलीय. गोंदताना असह्य वेदना होत, अशा विव्हळणारांना आठवत ज्ञोंफे त्यांची नक्कल करते. नि त्या जुन्या आठवणींवर फस्सकन हसते.
'पारी'नं ज्ञोंफेची भेट घेतली, तेव्हा ती 'आंघ'च्या कुंपणातील एका बांबुच्या झोपडीत बसलेली. ती सौम्य स्वरांत बोलली, अनेकदा बाहेरील उत्सवाच्या गलबलाटात तिचे शब्द विरून जात होते. आम्ही फोटोंसाठी तिची परवाणगी मागताच ती आनंदानं राजी झाली, नि पारंपारिक पोशाख व दागिणे घालून आली.