“इथे जमिनीत धान्य नाही, फक्त पॅड्स आहेत. जर तुम्ही अंदमान खोदलं तर तुम्हाला फक्त पॅड्स सापडतील!” चार महिलांच्या घोळक्यातून बाहेर येत सीमा मिश्किलपणे बोलली.
या केंद्रशासित प्रदेशातील वंदूर गावातल्या जवळजवळ प्रत्येक घरात, जमिनीचा एक असा कोपरा आहे ज्याला लाल रंगाने मार्क करण्यासाठी “X” या फुलीची आवश्यकता नाही. घरातील प्रत्येक महिला सहजपणे ती जागा शोधू शकते; असं ठिकाण जिथे त्या वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स पुरतात. मोंडल मुली लाजाळू असून त्या सॅनिटरी नॅपकीन्स कुठे पुरतात हे मला दाखवताना संकोचल्या.
“आम्ही महिनाभर पॅड्स गोळा करतो,” सीमा पुढे बोलत होती, “आणि मग मातीत एक खड्डा खणतो आणि त्यात पॅड्स पुरतो. प्रत्येक बाई तिच्या घराभोवती मासिक पाळीत वापरले जाणारे नॅपकीन्स पुरते. आमच्या घराजवळ एक जागा आहे, पण सध्या सगळीकडे चिखल आहे म्हणून आम्ही ते घराच्या एका कोपऱ्यात गोळा करून ठेवतो आणि नंतर ते पुरतो. कधीकधी आम्ही ते त्याच खड्ड्यात टाकतो तर कधीकधी नवीन खड्डा खणतो,” ती सांगते.
दक्षिण अंदमान जिल्ह्याच्या पश्चिम भागातल्या या गावात एका घराबाहेर बसलेल्या पाच महिला मासिक पाळी आणि कचरा विल्हेवाटीच्या पद्धतींच्या चर्चा करताना दिसतात. “कुणी याविषयी चर्चा का करेल? आम्ही या गोष्टींविषयी कधीच बोललो नाही.” मोंडल कुटुंबातली वृद्ध स्त्री ७२ वर्षांच्या उर्मिला आमच्यासोबत बोलू लागल्या. त्यांचं कुटुंब बंगाली स्थानिकांपैकी एक आहे ज्यांच्या अनेक पिढ्या या केंद्रशासित प्रदेशात आल्या.
“आम्हाला आमच्या मासिक पाळीविषयी खरंच कुणी सांगितलं नव्हतं,” त्या म्हणतात. “पूर्वीचे लोक बंगाली भाषेत मासिक [महिना] म्हणत असत. जेव्हा पाळी सुरू झाली तेव्हा आम्हाला तिच्याविषयी कळलं. मला मोठ्या बहिणीकडून याची माहिती मिळाली. मासिक पाळीच्या काळात आम्ही शाळेत जात नव्हतो किंवा मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडत नव्हतो. आम्ही घरातच असायचो पण स्वयंपाकघरात जात नव्हतो. ते नियम होते. मी त्यापैकी एकही मोडला नाही, त्यामुळे तुम्ही नियम मोडला तर काय होतं ह्याचीदेखील मला माहिती नाही,” त्या म्हणतात.
मोंडल घराबाहेर जमलेल्या महिला तीन वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या आहेत. त्यात सत्तरीतल्या उर्मिला, त्यांची ४१ वर्षीय सून सीमा मोंडल, सीमाच्या मुली,१७ वर्षीय बानी आणि २१ वर्षीय शिका, तसेच त्यांची नातेवाईक ३३ वर्षीय शिवानी मोंडल इथे आहेत. जुन्या मान्यता सांभाळून समाजात परंपरांना मार्ग दाखवणारे त्यांचे वेगवेगळे विचार आहेत.













