"एंगामी तोच ज्याला 'खोफी' विणता येते," नागालँडमधील खोणोमा गावचे पेलेसाली कुओत्सू म्हणतात. हा ३९ वर्षीय आदिवासी विणकर. 'झुसा' (बांबू) आणि 'थुन्ये' (वेत) यांपासून बनवल्या जाणाऱ्या खोफी अर्थात दुरडी विणतो. वर्षानुवर्षे एंगामी लोक या टोपल्या वापरत आलेत; सरपणासाठी डालगी, तांदळासाठी कणगी, पिकांसाठीची टोपली नि आणि धार्मिक विधींसाठी परडी अशा विविध वापरांसाठी वेगवेगळ्या खोफींचा उपयोग होतो. " या टोपल्यांमुळं आमची परंपरा टिकलीय. ही एक गोष्टय जी चिरंतन टिकली तर आम्हीही टिकून राहू," पेलेसाली नमूद करतात.
एकेकाळी स्थानिक जनजीवनात खोफी विणायची कला विरघळून गेलेली. या कणग्या विणून एंगामी आदिवासींना थोडं उत्पन्नही मिळत असे. पण आता 'खोणोमा' गावात इनमिन १५ पेक्षाही कमी कुटुंबं खोफी विणतात. त्यातही हे काम मुख्यत: वयोवृद्धच करताहेत. पेलेसाली मात्र त्यातल्या त्यात तरूण.
सूर्य तळपतोय. नि पन्नाशीतले केपे थोतो 'तेरहू'त बसलेत. तेरहू म्हणजे बांबूचे वासे नि वेतांनी उभारलेला आडोसा, ऊन्हाला थोपवण्यासाठी या तेरहूच्या छपरावर वाळलेल्या पाचोळ्याचं अच्छादन आहे. या सावलीत बसून केपे सटासट बांबूची साल काढतात. सराईतपणे बांबू सोलता सोलता ते म्हणतात –
"माझा जन्मच विणकरांच्या वंशातला. माझे चुलत भाऊ असोत की मी, आम्ही सगळेच खोफी विणत विणतच वाढलोय."
एंगामी हा नागालँडमधील १७ आदिम जमातींपैकी एक समुदाय. खोणोमात यांची वस्ती. हे गावही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं. अठराव्या शतकात येथील नागवंशियांनी ब्रिटिशांचा प्रतिकार केलाय. खोणोमा नागालँडची राजधानी कोहिमापासून २० कि.मी. अंतरावर पश्चिमेस वसलंय. या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य – गावानं जंगलातली शिकार नि वृक्षतोडीवर पूर्ण बंदी आणलीय. तसंच सेंद्रीय शेती सुरू केलीय.
२० चौरस किलोमीटरच्या डोंगराळ प्रदेशात विस्तारलेलं हे गाव. गावातील रस्ते अतिशय सुबक. दुतर्फा दगडांनी मढवलेले. पारंपरिक घरांच्या अंगणात नीटनेटके रचून ठेवलेले सरपणाचे ढिग. नि गावशिवारात टप्प्याटप्प्यानं विस्तारलेली भातखाचरं. अतिशय मनोहारी असं हे गाव.
खोणोमात ४०० हून अधिक एंगामी आदिवासींची वस्ती. लोकसंख्या : १९४३ (२०११च्या जनगणनेनुसार) डोंगरातील शिफ्टिंग कल्टिवेशन पद्धतीनं चर शेती नि वनोत्पादनावर ही माणसं गुजराण करतात. गावाला वेढून असलेल्या वनराईचं रक्षण-संवर्धनही गाव करतं. खोणोमा नेचर कंझर्व्हेशन नि ट्रॅगोपॅन अभयारण्याच्या माध्यमातून इथलं जंगल राखलं जातं.


















