अर्जिना बिबी आपल्या नॉर्थ २४ परगणा`मधल्या वडिलोपार्जित घरातल्या लहानपणीच्या शिवणकला शिकण्याच्या गमतीजमती सांगत आहेत. “मी जे काही शिकले, ते आई आणि आज्जीला बघून शकले. त्यामुळे माझ्या काथा कारागिरीमध्ये माझ्या आज्जीची शैली डोकावते.”
मागील ३० वर्षांपासून काथा शिवणकाम करून अर्जिना बिबी आपल्या कुटुंबाच्या अर्थार्जनाला हातभार लावत आहेत. सध्या पन्नाशीच्या जवळपास वय असलेल्या अर्जिना बिबी ६ महिलांचा काथा शिवणकला गट चालवतात.
जुलै महिन्यात तळपत्या सूर्याच्या साक्षीने एका दुपारी आम्ही नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातील बारासात येथे आम्ही अर्जिना बिबींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेटलो. त्यांच्या या छोट्याश्या कार्यशाळेत सगळीकडे रंगीबेरंगी दोऱ्यांचे संच, कात्र्या, कागदे पडलेली आहेत. ही कार्यशाळा त्यांनी त्यांच्या शेजारी आणि सहकारी नूरनहर बिबी यांच्या घरातील मुख्य खोलीमध्येच थाटली आहे. महिला कापडांवर चाल शिलाई करण्यात मग्न आहेत, जे काथा शिवणकला परंपरेतील एक मुख्य घटक आहे.
“माझे पती 'काथा' कपड्यांचे व्यावसायिक आहेत” ३५ वर्षीय नूरनहर बिबी सांगतात. “त्यांना ज्या ऑर्डर्स येतात, त्यामध्ये आम्ही त्यांना आम्ही मदत करतो.” त्यांचे पती, ४३ वर्षीय मोहम्मद जलालुद्दीन तीन पिढ्यांपासून याच व्यवसायात आहेत. “ते अतिशय चांगले काथा कलाकार आहेत.” नूरनहर थोड्याश्या लाजतच सांगतात!
जलालुद्दीन जवळच उभे आहेत. त्यांची खोडी काढायची म्हणून मग अर्जिना बिबी पण सामील होतात. “बायकाच जास्त चांगली काथा कलाकुसर करू शकतात. कारण आम्ही त्यात आमच्या भावना ओततो ना..... पुरुष काय या कडे व्यवसाय म्हणून बघतात.”
















