"कौडी, कौडी, कौडी, कबड्डी, कबड्डी, कबड्डी...."
मातीतल्या गोलातून जोरजोरात ओरडत होते.. रेडर्स (प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टात जाणारा खेळाडू) आणि स्टॉपर्स (बचावकर्ते खेळाडू) चढा-ओढीचं दृश्य. दिल्लीबाहेर सिंघू आणि टिक्रीच्या सीमेवर २०२०-२०२१ मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं. कबड्डीचं निवेदन निषेधाच्या घोषणा आणि भाषणांमध्ये मिसळलं होतं. शेती संबंधित तीन कायदे रद्द होईपर्यंत लाखो शेतकरी आणि शेतमजूर तिथं निषेध करत उभे होते.
सप्टेंबर २०२१ मध्ये आठवडाभर चाललेल्या स्पर्धेच्या शेवटी एका नवीन खेळाडूचा उदय झाला तो म्हणजे हरियाणातल्या रोहतकमधल्या शिलू बलहाराचा. पंजाबमधल्या कबडीपटूंच्या संघात तो सामील झाला, जिथनं अल्प उत्पन्न असलेल्या आणि वंचित जमातींमधल्या तरुणांना आर्थिकदृष्ट्या भक्कम आधार मिळतोय.
पंजाबच्या गावांमधली मुलं खेळायला सुरुवात करतात, त्या खेळांमधला पहिला खेळ म्हणजे वर्तुळ शैलीतली कबड्डी. या खेळाचं आकर्षण त्याच्या साधेपणात आहे; या खेळाला कोणतंही साधन लागत नाही – बऱ्याचदा खेळाडू बूटही घालत नाहीत. सोपे नियम आहेत आणि हा खेळ मातीत खेळला जातो.
शारिरीकदृष्ट्या हा खेळ आव्हानात्मक असल्यानं शरीरयष्टी मजबूत बनवण्याचा अभिमान बाळगणारे तरुण या खेळाकडे जास्त आकर्षित होतात. या खेळाला पंजाबी कबड्डी असंही म्हणतात – जत्रांमध्ये, सामुदायिक संमेलनांमध्ये आणि स्थानिक स्पर्धांमध्ये हा खेळ खेळला जातो.
पंजाबमध्ये कृषी दिनदर्शिका विचारात घेऊन कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जातात. कबड्डीचे सामने पेरणीनंतर - ऑक्टोबरमध्ये सुरू होतात आणि एप्रिल म्हणजे कापणीपर्यंत चालू राहतात.




















