हवेमध्ये चुलीचा धूर आणि सोबत भाजलेल्या हुरड्याचा खमंग दरवळ. जवळच कुठे तरी हुरडा पार्टी सुरू असल्याची ही खूण. ज्वारीची कोवळी कणसं खुडून भाजून त्याचे दाणे हुरडा म्हणून अगदी आवडीने खाल्ले जातात. आणि डिसेंबर-जानेवारीच्या काळात मराठवाड्याच्या बऱ्याच भागात अशा हुरडा पार्ट्या पहायला मिळतात.
“लोक वाट पाहत असतात,” सूर्यकांत मैंड सांगतात. जालन्याच्या लोंढ्याची वाडी गावात त्यांची पाच एकर शेती आहे. मालदांडी ज्वारीचं पीक ते घेतात. डिसेंबर महिन्यात हुरड्यासाठी निम्मी ज्वारी काढायची आणि बाकी फेब्रुवारी-मार्चमध्ये.
हुरड्याची कणसं घेऊन मैंड जालन्याच्या दिशेने निघतात. दर हंगामात किमान ४० किलो हुरडा विकला जातो असं ते सांगतात. किलोमागे १५० रुपये मिळतात.
हुरडा पार्टीची तयारी बरीच असते. आणि बरंचसं काम बायाच करतात. मातीत खड्डा करून त्यात कडब्यावर ज्वारीची कोवळी कणसं भाजली जातात. लांबक्या काठ्यांनी कणसं पलटवून एकसारखी भाजायला लागतात. “लगेच काढली, तर कच्ची राहतात आणि जास्त भाजली तर दाणा चिवट होतो,” भीमा नाना ढाकणे सांगतात. ढाकण्यांची औरंगाबाद (आता छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यात शेती आहे.
भाजलेली कणसं हाताने चोळून त्याचे दाणे काढले जातात. हे काम बायांचं. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू. “सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी चुलीपाशी असते. सोबत इतर बायाही असतात,” सविता ढाकणे सांगतात. “पण आमच्या स्वतःच्या शेतात पिकलेलं धान्य लोकांना खाऊ घालणं भारी वाटतं.”














