या संपूर्ण प्रक्रियेचा त्या कणा आहेत. त्या दररोज तीन क्विंटल वांग्याचं भरीत शिजवतात, जे देशभरात ‘बैंगन का भरता’ म्हणून ओळखले जाते. जळगाव जिल्हा प्रशासनाने या अविरत चालणाऱ्या उपहार गृहाचा निवडणूक जनजागृतीचा व्हिडीओ शूट केल्यानंतर, त्यांचे चेहरे आता सर्वत्र ओळखले जाऊ लागले आहेत.
१३ मे रोजी जळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महिलांची मतदानाची टक्केवारी सुधारण्याच्या उद्देशाने या व्हिडिओमध्ये कृष्णाजी भरीत इथे काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या हक्काबद्दल काय माहिती आहे आणि त्या दिवशी त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्याच्या प्रक्रियेबद्दल त्यांना काय समजले याबद्दलची चर्चादेखील दाखवण्यात आली आहे.
मीराबाई नरल कोंडे सांगतात की, “जेव्हा आम्ही मतदान यंत्रासमोर उभे राहतो, आमच्या बोटावर शाई लावली जाते तेव्हा त्या एका क्षणासाठी आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त असतो.” मीराबाईंचे कुटुंबीय एक छोटं केशकर्तनालय चालवतात. या उपहारगृहातून मिळणारा त्यांचा पगार घरातील उत्पन्नातला महत्त्वाचा वाटा आहे. त्या सांगतात, “आम्ही पती, पालक, मालक किंवा एखाद्या नेत्याची मदत न घेता मशीनसमोर आमच्या आवडत्या उमेदवाराची निवड करू शकतो.”
कृष्णाजी भरीत यांच्या स्वयंपाकघरातील भरीत उत्पादन वांग्याच्या हंगामात म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत ५०० किलोपर्यंत पोहोचते. हिवाळ्यामध्ये स्थानिक बाजारपेठेत सर्वोत्तम वांगी येतात. ताज्या कुटलेल्या आणि तळलेल्या मिरच्या, धणे, भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि खोबरे यांची चव या पदार्थाची खासियत आहे असे या महिलांचे म्हणणे आहे. ३०० रुपयांपेक्षा कमी दरात असल्याने अनेक कुटुंबं एक किलो किंवा त्यापेक्षा जास्त भरीत विकत घेऊ शकतात. इथे येण्यासाठी लागणारे भाडेदेखील परवडणारे आहे.
१० x १५ फूटांच्या स्वयंपाकघरात चार शेगड्यांची भट्टी सुरू असते, ज्यामध्ये दाल-फ्राय, पनीर मटर आणि इतर जवळपास ३४ प्रकारचे शाकाहारी पदार्थ इथे बनतात. या सर्व पदार्थांमध्ये भरीत आणि शेव भाजी मात्र अव्वल ठरतात. शेव भाजी म्हणजे बेसनापासून बनवलेली कुरकुरीत शेव आणि रस्सा.