चंद्रमा काठगोलाप म्हणजेच चाफ्याची सायीसारखी पांढरी आणि पिवळी सुवासिक फुलं एका लांबसडक माळेत गुंफत आहेत. त्यांच्या सोन्याच्या सुंदर आणि मोठाल्या नथन्या - अगदी अचूक सांगायचं तर तीन नथन्या –एप्रिलमधल्या दुपारच्या चमकदार पिवळ्या सूर्याबरोबर त्यांच्या हातातल्या चाफ्याच्या सुंदर फुलांमधल्या गडद पिवळ्या मध्यभागाशी स्पर्धा करतायत. ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातल्या पुतोपांडी गावाबाहेरच्या एका मोकळ्या जागेत त्या आणि गदाबा आदिवासी समुदायाच्या आणखी वीस महिला फुलांच्या माळा विणण्यात मग्न आहेत. त्या सगळ्या जणींनी दोन किंवा तीन नथन्या घातल्या आहेत.
“या उजव्या नाकपुडीतल्या नथनीला आम्ही बेसरी म्हणतो, मधल्या नथनीला दोंदी आणि डाव्या नाकपुडीतल्या नथनीला नत्तो म्हणतो. माझ्या नाकात अगदी कायम असतात या. कोण जाणो, या घालूनच जन्माला आलेय बहुतेक,” सत्तरीत असलेल्या चंद्रमा गदाबा हसत सांगतात. त्यांची दोंदी थोडीशी वर उचलली आहे, त्यामुळे त्यांचा खालचा ओठ जरासा दिसतो. एरवी नाकाच्या पडद्यामधून लटकणाऱ्या सोन्याच्या लटकनमुळे तो लपलेलाच असतो.
त्या सांगतात, “पूर्वी आमच्या गदाबा जमातीत मुलींना अगदी लहानपणीच तिन्ही नथन्या घालायला लावायचे. पण आता जरा उशिरा नाक टोचतात, पाच किंवा दहा वर्षांच्या झाल्यावर. कधीकधी तरुण मुलींना नाक टोचायला अजिबात आवडत नाही.” प्रत्येक वाक्याच्या बरोबरीनं, नुकत्याच तोडलेल्या मूठभर ताज्या फुलांचा हार त्यांच्या कुशल बोटांनी बांधला जातोय. संध्याकाळी शिकारीच्या मोहिमेवरून परतल्यावर तो हार घालून पुरुषांचं स्वागत केलं जाईल. हा सण म्हणजे चैत परब (ज्याला चैत्र पर्व देखील म्हणतात).
ओडिशा आणि झारखंडमधील अनेक आदिवासी जमातींमध्ये साजरा केला जाणारा १४ दिवसांचा कृषी उत्सव चैत परब म्हणजे चैत्र महिन्याची सुरुवात दर्शवतो. एप्रिलचा मध्य हा परंपरेने शेतातल्या कामांमधून विश्रांती घेण्याचा काळ असतो. जेव्हा हवेत उन्हाळी गाण्यांचे सूर भरून राहिलेले असतात आणि ऋतू फळा-फुलांची मुक्तहस्ताने उधळण करत असतो. गदाबा समुदायाच्या तरुणी आणि वृद्ध स्त्रिया गातात, नाचतात, पितात, ग्रामदेवतांना कैरी अर्पण करतात आणि शिकारीसारखं साहस करून परतणाऱ्या पुरुषांच्या स्वागतासाठी फुलांचे हार विणतात.








