१ जानेवारी १९६३. दुलेश्वरी सारेन यांची रेशन कार्डावर नोंदलेली ही जन्मतारीख. अशक्त नि वृद्ध झालेल्या या संथाळ आदिवासी आजींनी प्रत्यक्षात याहून बरेच जास्त पावसाळे पाह्यले असणार. “एव्हाना शंभरी गाठली असणार त्यांनी!’’ प्रमिला किस्कू सांगत असते. प्रमिला ही त्यांची पणती. साधारण १६ वर्षांच्या आसपासची!
पश्चिम बंगालमधल्या शांतिनिकेतन जवळच्या बागानपाडा भागातलं हे घर. नव्वदीच्या घरातल्या वयोवृद्ध दुलेश्वरी आजींचं. इथल्या वळणावळणाच्या गल्ल्यांमधे भटकी कुत्री आणि पाळीव कोंबड्या सोबतीने वावरतात- आळसावलेली कुत्री इथे निवांत पहुडलेली असतात नि कोंबड्या मग्न असतात मातीतलं काहीतरी टिपण्यात!
“शांतिनिकेतन… आमार नातनीर नाम [शांतिनिकेतन… माझ्या नातीचं नाव!]’’ दुलेश्वरींचा आवाज हळूहळू मंदावत जातो. आपल्या बारीक केलेल्या पिकल्या केसातून हात फिरवत त्या हलकेच हसतात.
“उकून होयेछिलो [उवांनी उच्छाद मांडला होता माझ्या केसात!],’’ त्या सांगतात. “आता उवा काढायला वेळ आहे कुणाकडे? म्हणून मग हिने थेट माझे केस कापून बारीकच करून टाकले,’’ शेजारी बसलेल्या प्रमिलाकडे बोट दाखवत बोलणाऱ्या दुलेश्वरी आजींच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच टवटवीत असतं, “ही [प्रमिला] रोज मला चहा करून देते आणि आठवणीने माझी नखंही कापते,’’ दुलेश्वरींची माया त्यांच्या आवाजातून व्यक्त होत राहते.








