स्मशानाची देवता म्हणजे सुडलई काली. तिला निवद म्हणून दाताने कोंबड्याचं मुंडकं उडवून झाल्यावर ऐश्वर्या तोरप्प म्हणजेच बकऱ्याचं फफीस तोंडात धरते आणि डाव्या हातात विळा फिरवत एका लयीत पुढे निघते. काळी साडी नेसलेली ऐश्वर्या पम्बई आणि परई या ढोलांच्या तालावर वर्दळीच्या रस्त्याने निघालीये. देवी पुत्र पूनकवनत्थ अम्मन मंदिरापासून निघालेली यात्रा तिरुवळम गावातल्या पूनइ नदीकडे चाललीये. नदीच्या कोरड्या ठाक पात्रापर्यंत सगळे भाविक पोचतात आणि तिरुनंगई (पारलिंगी) ऐश्वर्या तिथेच कोसळते. आणि हे काही कुठलं नाटक किंवा कसला अभिनय नाही. सदतीस वर्षीय ऐश्वर्याची स्वतऋची नाटक कंपनी आहे आणि ती नाटकं सादर करते पण अजून त्याला काही तास आहेत. दिवस मावळला की चेहऱ्याला रंग लागणार.
तर, दर वर्षीप्रमाणे तमिळ नाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातल्या तिरुवळम गावात मयना कोळ्ळइ उत्सव सुरू आहे. मासी (मार्च) या तमिळ महिन्यातल्या अमावसइ म्हणजेच अमावास्येला दलित समाज हा सण साजरा करतो. ऐश्वर्या चक्किलियार या अनुसूचित जातीची असून गेल्या वीस वर्षांपासून या उत्सवात सहभागी होत आहे.
“नाचत होते ती मी नव्हतेच,” ती नंतर सांगते. “मला काहीही आठवत नाहीये. माझ्या अंगात अम्मनचं वारं आलं होतं.” अम्मन हे कालीचंच रुप. तिच्या समाजाचे लोक तिची पूजा करतात. सगळे विधी पार पडले की रात्री १० वाजता नाटकाचे खेळ सुरू होतील.
रात्रीचं सगळं वातावरणच वेगळंय. रस्त्याच्या मधोमध उभारलेल्या १० बाय १२ फूटाच्या मंचावर इकडून तिकडे फिरणारी ऐश्वर्या आता पुन्हा एकदा उत्साहात आलेली दिसते. उत्सवाच्या आयोजकांना ती काही सूचना देतीये. बॅनर कुठे लावायचा, ५०० वॉटचे दिवे कुठे टांगायचे, असं सगळं सुरू आहे. “त्या दोन दिव्यांची तोंडं मंचाकडे असू द्या. थोडे कोनात ठेवा,” ती सांगते. ती रंगमंचाची व्यवस्था पाहते. वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना सगळं काही तिच्याकडे. तीच दिग्दर्शक आहे आणि तीच पटकथाकार. आणि या नाटक कंपनीची प्रमुखही ऐश्वर्याच आहे. तिच्या कंपनीचं नाव आहे अशोक नाटक मंडरम. स्टेजवर लावलेल्या बॅनरवर हे नाव अगदी ठळक अक्षरात रंगवलेलं आहे.



