जवळच्या विझणाऱ्या निखाऱ्यांकडे शांतपणे पाहणारे रियाझ अहमद म्हणतात, “आम्हाला हा पदार्थ गॅसवर शिजवायचा होता. पण सध्या गॅसचा तुटवडा जाणवतोय म्हणून मग मी तो लाकडावर शिजवायचा ठरवलं. आता हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारा खर्च दुपट्ट झालाय.”
५० वर्षीय रियाझ अहमद अंचारी हे एक वाजा आहेत, कश्मिरी आचाऱ्यांना ‘वाजा’ म्हटलं जातं. रियाझ इथं मित्राच्या बहिणीच्या लग्नात प्रमुख वाजा आहेत आणि ते एका पेचप्रसंगात सापडलेत.
तीन हजार किलोमीटरवर सुरू असलेल्या युद्धानं इथल्या लग्नसोहळ्यातल्या जेवणाचीही रंगत घालवली.
सुरुवातीला हे घर चैतन्यमय वाटत होतं. लोक पारंपरिक गाणी गात होती, काही त्यावर नृत्य करत होती, तर काहीजण पाहुण्यांच्या स्वागताच्या लगबगीत होते. रंगीबेरंगी लायटिंगच्या माळांनी घर न्हाऊन निघालं होतं.
मला वाजाविषयी नेहमीच कुतुहल वाटलंय. त्यांच्या गोष्टी, पिढ्यानपिढ्या ते बनवत आलेल्या पाककृती यांविषयी मला नेहमीच आकर्षण वाटलंय. म्हणूनच मी लग्नाचा स्वयंपाक तयार झाल्यानंतर साधारण रात्री ११ वाजता या आचाऱ्याच्या शेजारी जाऊन बसलो.
इथला प्रत्येक वाजा अत्यंत कुशल आहे. एक जण मांस कापण्यात पारंगत आहे तर दुसऱ्याला मंद आचेवर पदार्थ शिजवण्याचं गणित माहितीये. तिथे आणखी एक वाजा होता तो फक्त पदार्थाकडे बघून त्यात कुठली चव कमी आहे हे ओळखण्यात पटाईत आहे.











