५० वर्षीय सुभाष बिक्कड यांनी जवळपास वीस वर्षे छत्रपती संभाजीनगर इथल्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रक चालक म्हणून काम केलं. अन् डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करून प्रगतीची नवी वाट धरली.
“मी आणि माझ्या दोन मित्रांनी मिळून आमची स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू केली. आम्ही तीन ट्रक व कंटेनर विकत घेतले.” आम्ही तिघंही एकाच गावातले अन् तिघांनीही कामानिमित्त देशभरात ट्रक चालवले होते. “पुण्यातल्या आमच्या एका मित्रानं जामीनदार राहून आम्हाला मदत केली.”
ट्रक चालक ते मालक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. ही यशोगाथा बिक्कड आणि त्यांच्या मित्रांचीच नाही तर त्यांच्या सारणी सांगवी गावातल्या ८० तरुणांचीही होती. म्हणजेच १,४६० लोकसंख्या असलेल्या या गावातल्या प्रत्येक चौथ्या घरात ट्रकचा व्यवसाय होता. सारणी सांगवी हे दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातली जोडगाव आहे.
साल २०२५ पर्यंत सारणी सांगवी हे ट्रक आणि ट्रक कंटेनरचं (ज्याला शिपिंग किंवा कार्गो कंटेनरही म्हणतात) गाव बनलं होतं. गावातल्या ८० जणांकडे मिळून ४०० ट्रक आणि लोडिंग कंटेनर आहेत. व्यवसायाने चांगली गती घेतली आणि देशातल्या काही मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी त्यांना काम द्यायला सुरुवात केली. अनेकांनी एकमेकांच्या पत-हमीवरयशाची शिखरं गाठली. सरपंच सुनील केदार यांनी 'पारी'ला सांगितलं, “आम्ही सर्व ट्रकची शेतात पूजा करून दिवाळी साजरी केली.”
ट्रक-कंटेनर हेच आता गावाचे दैवत बनले होते.
पण आज, त्यातल्या कितीतरी ट्रक आणि कंटेनरची चाकं आहे तिथंच थांबलीयेत. गावात क्वचितच ट्रक आमच्या नजरेस पडले. अमेरिकेने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळे सारणी सांगवीच्या भरभराटीला मोठा धक्का बसलाय; तसेच अनेक प्रकारचे रस्ते कर यांसारख्या इतर कारणांमुळे ही भरभराट आधीच काहीशी ओसरली होती.







