सगुणाची कथा
वणक्कम! मी सगुणा. २००८ पासून मी हे मातीकाम करतेय. अगदी लहान वयातच मी पोरकी झाले.
मी लहान असतानाच माझ्या वडिलांचं निधन झालं. मग घराजवळच्या एका सिरॅमिक मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात माझी आई कामाला जायला लागली. ती त्या लहान लहान मूर्ती घरी आणायची. त्यांचं फार आकर्षण वाटायचं मला. छोटी म्हणजे अवघी चार वर्षांची होते मी! पण तेव्हापासूनच मला शाळेपेक्षा त्या मूर्तीच जास्त आवडायच्या. या मूर्ती कशा बनवतात, कशापासून बनवतात, असं मनात येत रहायचं.
माझी आई जेव्हा वारली, तेव्हा माझी आजी मला म्हणाली, “तुला आता शाळेत पाठवता येणं अवघड आहे. तुला नाही सांभाळू शकणार मी.” माझ्या बहिणीच्या सोबतीने मग तिने मलाही त्याच कारखान्यात कामाला धाडलं. तेव्हा १० वर्षांची होते मी.
सुरुवातीला मला कुणी मूर्तीला हात नाही लावू दिला; फक्त माती मिसळायचं नि चाळायचं काम मला दिलं जायचं. अशी दोन वर्षं सरली; मग मी साच्यांमध्ये माती ओतायला लागले. साचे कसे बनवायचे तेही मी हळूहळू शिकले. पण मग आणखी काहीतरी चांगलं करावं असं माझ्या मनाने घेतलं. मातीकामाची कला शिकायची असं मी ठरवलं.
चार वर्षं लागली मला ही कला शिकण्यासाठी. १४ वर्षांची होते तेव्हा मी सुरुवात केली. त्यावेळी दिवसाला माझी कमाई होती ७५ रुपये! कलाकारांना त्यावेळी १०० रुपये मिळायचे. मी जेव्हा तेवढेच पैसे मागितले तेव्हा मला उत्तर मिळालं, “लहान आहेस तू अजून!” ते काम सोडलं मग मी!
मी त्यानंतर कंत्राटावर कामं घ्यायला सुरुवात केली. जवळपास १० कंपन्यांची ऑर्डर मला मिळाली. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, जसजसं आपलं कौशल्य वाढेल, तसतसं आपलं कामही वाढेल आणि पतही!
हळूहळू लोक माझ्याकडे आदराने पाहू लागले. त्यावेळी असं होतं की फक्त कलाकारच टेबलावर बसायचे; बाकी सगळे खाली; जमिनीवर! विशेष म्हणजे, ज्यांनी मला कामावरून काढून टाकलं होतं, तेच आता मला परत बोलावायला लागले. डोळे, ओठ, लहानसहान बारकाव्यांबाबतची निगुती आणि रेखीवपण हे माझ्या कामाचं वेगळेपण ठरलं.
काही ठिकाणचं वातावरण मात्र अगदी असह्य होतं. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोण, आमची केली जाणारी चेष्टा… कुणी कितीही पैसे देऊ केले तरी असल्या कामांवर मी काही परत गेले नाही.
अशाच एका कारखान्यात माझी आणि माझ्या नवऱ्याची पहिल्यांदा भेट झाली. त्याला खरंतर परदेशात जायचं होतं. पण मी त्याला सांगितलं, “आपण जर लग्न केलं तर तुला माझ्यासोबत राहून ही कंपनी चालवावी लागेल.” माझी तेवढी एकच अट होती.
खरंच, का इतकं आवडतं मला हे काम? मातीकाम आहे ते; म्हणून कदाचित! मातीला मी आकार देते, त्यातून जिवंत कथा साकारते. माझं काम बघून लोक खूश होतात, कौतुक करतात. यातूनच मला आनंद मिळतो. हा आनंद जगण्याची ऊर्जा देतो मला!