तरंगत तरंगत क्रूझ बोट चाललीय सजनेखाली व्याघ्र प्रकल्पातून, पीरखाली आणि दोबंकी व्याघ्र प्रकल्पातून… पण आजूबाजूची दृश्यं पाहण्याइतकी फुरसत भानुमतीपाशी नाही. विस्तीर्ण पसरलेलं वाहतं पाणी, मचाणं आणि झाडापानातून डोकावणारे पक्षी हे सारं तिच्या नजरेसमोर धूसर होत जातंय. क्रूझवरच्या भानुमतीसारख्या स्वयंपाकी आणि मदतनीस कामात व्यग्र आहेत. त्यांना बटाटे, डाळी आणि अंडी उकडायची आहेत, लसूण आणि आलं चिरायचंय, मसाले वाटून तयार ठेवायचेत. निरनिराळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठीची तयारी भरात आलीय.
दिवस चढत जातो तसा उष्णतेचा चटका वाढत जातो आणि स्वयंपाकघरातल्या या महिलांना किंचित विश्रांती घेऊन जीवाला थोडं थंड करावं लागतं. “ताडाताडी हात चला [चला, आवरा पटापट],’’ त्या एकमेकींना सांगत असतात. “एकदा का मोटर सुरू झाली की मग आपणच उकडून निघणार,’’ लिपिका मंडल हसत म्हणते. कधी स्वयंपाकी तर कधी मदतनीस म्हणून ती बोटीवर काम करते. ती बोलतीय त्याचा रोख बोटीवरच्या स्वयंपाकघराच्या शेजारीच असलेल्या मोटरकडे आहे. या मोटरच्या उष्णतेमुळे आत आणखी गरम होतं. इथल्या उकाड्यातून पाच मिनिटंही सुटका मिळत नाही, असं इथे राबणाऱ्या बायका सांगतात.
कोलकात्यापासून ११० किलोमीटरवर असलेल्या पाखीरालय गावातून या क्रूझ सुटतात. पाखीरालय वसलंय सुंदरबनच्या गोसाबा बेटावर! हे लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे सुंदरबनच्या मुख्य वनक्षेत्राचं प्रवेशद्वार आहे. या जंगलात रॉयल बेंगॉल टायगर म्हणजेच पट्टेरी वाघ (पँथेरा टायग्रिस टायग्रिस) दिसू शकतो.
टूर ऑपरेटर एका बोटीतून साधारणपणे ४० पर्यटकांना घेऊन जातात. सहा तासांच्या क्रूझ प्रवासासाठी माणशी दोन ते पाच हजार रुपयांदरम्यान किंमत मोजावी लागते. दोन दिवस प्रवास घडवणारे क्रूझ जास्त महाग असतात. या बोटींमध्ये सहसा दोन मजले असतात. तळमजल्यावर गाद्या-उशा असतात. दिवसाच्या उकाड्यात पर्यटक इथे आराम करू शकतात.










