“इच्छे कुसुम नाटकामध्ये मी एक विणकर होतो... खऱ्या आयुष्यात आहे ना अगदी तसा,” असित प्रामाणिक सांगतात. हातात एका जुन्या नाटकाचं स्क्रिप्ट. रंग उडालेल्या एका लोखंडी कपाटातल्या कप्प्यांमधून त्यांनी अनेक साऱ्या नाटकांच्या पटकथा शोधून काढल्या.
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात शांतीपूर भागामध्ये हातमाग विणकरांच्या वस्त्या आहेत. असित दा तिथलेच एक विणकर आहेत. इथल्या हातमागावर विणलेल्या शांतीपुरी टांगाइल आणि जामदानी साड्या सुप्रसिद्ध आहेत. हातमागावरचं प्रेम नाटकावरच्या प्रेमाइतकंच गहिरं आहे. गेली साठ वर्षं जणू काही तांत-घर (हातमागाची खोली) आणि रंगमंच या ताणाबाण्यानेच त्यांचं आयुष्य विणलं गेलंय.
रंगमंचावरच्या पहिल्या मोठ्या नाटकाचा विषय काढला की आजही असित दांचा चेहरा अगदी आनंदाने फुलून जातो. “सियालदा स्टेशनच्या जवळ कुठे तरी प्रयोग होता. मी न्यायाधीशाच्या भूमिकेत होतो पण खरं सांगू, मला भीतीने कापरं भरलं होतं,” मोठ्याने हसत ते सांगतात. प्रेक्षकांसमोर, खुल्या मंचावर, एका मोठ्या नाटक कंपनीसाठी ते पहिल्यांदाच काम करत होते.
अगदी अशाच उत्साहात आपण विणकामामध्ये कसं आलो त्याची गोष्ट असित दा आम्हाला सांगतात. “मी पाचवीपर्यंत शिकलो. विणकराच्या घरात लहान मुलांपासून ते बायांपर्यंत अगदी सगळे हातमागावरचं काही ना काही काम करतच असतात.” सूत गुंडाळणं, रंगवणं, टकळीचा वापर करून रिळं भरणं, त्यानंतर तेच सूत परत एका ड्रमवर गुंडाळणं आणि त्यानंतर ते मागावर चढवणं अशी सगळी कामं विणकराच्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या व्यक्ती करत असतात. “आणि सगळ्याच तांती [विणकर] घरांसारखं आमच्याही घरात अगदी लहानपणापासून आम्ही या कामात आलो,” ते सांगतात.








