विराट कोहली म्हणजे त्याचं दैवत. तिला आवडायचा बाबर आझम. कोहलीने शतक ठोकलं की तो तिला मुद्दामहून सांगायचा. आणि बाबर चांगला खेळला की ती देखील त्याला चिडवायची. क्रिकेटवरनं अशी चिडवाचिडवी म्हणजे नुरुल आणि आयेशाची प्रेमाची भाषा होती. त्यांचं ते एकमेकांना चिडवणं, हास्यविनोद पाहिल्यावर या दोघांचं अगदी स्थळं पाहून लग्न झालंय यावर कुणाचा विश्वासच बसायचा नाही.
२०२३ साली जून महिन्यात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धांचं वेळापत्रक आलं आणि आयेशाचे डोळे एकदम लुकलुकले. भारत वि. पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला गुजरातेत अहमदाबादला होणार होता. “मी नुरुलला म्हणाले, ही मॅच आपण स्टेडियममध्ये बसून पहायची,” ३० वर्षीय आयेशा सांगते. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजाचे कुर्ले या तिच्या माहेरी आम्ही बोलत होतो. “भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आता कुठे मॅचेस होतायत? आमच्या दोघांच्या आवडत्या खेळाडूंना एकत्र पाहण्याची अगदी दुर्मिळ संधी होती.”
३० वर्षीय नुरुल सिव्हिल इंजिनियर. त्याने एक दोन फोन केले आणि चक्क दोन तिकिटं मिळवली. दोघंही जाम खूश झाले. आयेशाला तेव्हा सहावा महिना सुरू होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या पुसेसावळी या आपल्या गावाहून ७५० किमी लांबचा प्रवास कसा करायचा याचं अगदी तपशीलवार नियोजन दोघांनी केलं. रेल्वेची तिकिटं काढली आणि राहण्याचंही बुकिंग करून टाकलं. मॅचचा दिवस आला पण हे दोघं काही तिथे पोचू शकले नाहीत.
१४ ऑक्टोबर २०२३ उजाडला. नुरुलला जाऊन एक महिना उलटला होता आणि आयेशा उद्ध्वस्त झाली होती.








