टिप : पारीनं यापुर्वी वेळोवेळी वृद्धांशी तसंच विकलांगतेशी निगडीत वार्तांकन केलंय. यापुढे आम्ही या विषयांना केंद्रिय महत्त्व देऊन खास वृत्तकथा प्रसिद्ध करत आहोत. हा लेख त्या मालिकेचं सुतोवाच.

Sangrur, Punjab
|WED, OCT 01, 2025
मखमली हरितक्रांतीतली रक्तवर्णी पानगळ : पंजाबची दास्तान
शेती आधुनिक झाली. मशिननं माती मऊ केली, सोबत माणसंही चेचली. कृषीयंत्रांच्या अपघातांत पंजाबमधील कित्येक शेतकरी जायबंदी झाले. उमेदीच्या वयात अनेक विकलांग झाले. काळासोबत दुडक्या चालीनं फरफटत आलेल्या अशा वृद्ध शेतकऱ्यांचा कानोसा. १ ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्तानं
Author
Editor
Photo Editor
Translator
दशकं लोटली ती घटना घडून. उजवा हात निखळून. पण अजूनही आपण अधू आहोत, असं सुरजितसिंगना वाटत नाही. जणू काही घडलंच नाही, असं ते शेतात राबतात.
“ऐहो ज्या कोई कम्म नी, जिन्नू मै ना कर सक दां!” सुरजितसिंग सांगतात, “घास छटाई सोडता सबकुछ करतो मी - छटाई करायला एका हाती गवत, दुसऱ्यानं विळा चालवायला लागतो, ते जमणं मुश्कील!” शेतात राबराबून पिकलेला हा शेतकरी, विकलांग असूनही स्वत:ला हरफनमौला मानतो. संगरूर जिल्ह्यातील रंगीयाँ गावशिवारात त्यांचं दहा एकर शेत. या रानांत बसलेला हा वृद्ध पहाटे पासून मावळतीपर्यंतच्या आपल्या कामांचा पाढा ऐकवतो.
कुलवंत कौर, त्यांची बायको. तिला नवऱ्याच्या बाता पटत नाहीत. सुरजितसिंगच्या थापांना ब्रेक लावत ती म्हणते, ‘पायजम्याची नाडी धड बांधता येईना ह्यांना,’ तिच्या थट्टेत नवऱ्याविषयी करूणाही जाणवते, “आवो, खाजवायला हात लागतो ना, तोच नाय. हा बाप्या सदानकदा दिसंल तुम्हाला भिंतीला नायतर झाडाला पाठ रगडताना. सक्काळी परसाकडला गेले की धुता तरी कुठं येतंय!”
अशी गत असूनही सुरजितसिंग सरकारच्या दिव्यांग सहायता योजनेसाठी अपात्र ठरलेत. ते तलाठ्याकडे गेलेले. पटवारी म्हणाला, “तुम्ही जमीनदार. दिव्यांग योजना भूमिहीनांसाठी आहे. ते ऐकून मी माघारी आलो.” सुरजितसिंग सांगतात. खरंतर तलाठ्यानं दिलेली सबब हास्यास्पद. भूमीहिन असो, नसो दिव्यांग असणं एवढीच या योजनांचा लाभार्थी असण्याची सनदशीर पूर्वअट. पण सुरजितसिंगना हात गमावल्याची भरपाई मिळालीय ना दिव्यांग पेन्शन. (पंजाबमध्ये दिव्यागांना दरमहा १५०० रू. पेन्शन मिळते). इतकंच काय सरकार ६० ते ६९ वयोगटातील बुजुर्गांना १५०० रू नि ७० पुढीलच्या वयोवृद्धांना २००० रू. पेन्शन देतं. या वृद्धा पेन्शन योजनेतही त्यांचं नाव नाही.

Vishav Bharti

Vishav Bharti
हा बोधीवृक्षासारखा दिसणारा ७२ वर्षांचा बुजुर्ग, शेतात राबायच्या आपल्या ताकदीवर बेहद्द खुश जाणवतो. अशा माणसाचा अपघात झाला कसा? ही घटना घडली, तेव्हा नव्वदचं दशक निम्म्यावर आलेलं. सूरजित ती आठवण सांगतात, “माझा भाऊ कडबा कुट्टीपासून मला दूरच रहा म्हणायचा, कारण मी जरा चंचल माणूस. पण त्या दिवशी आम्ही टोका (कुट्टीचं यंत्र) रिपेअर केलेला. अन् मी उत्साहानं ऊसाची कांडं कुट्टीत सरकवू लागलो. अचानक माझं बोट रोलरमध्ये गेलं, मागोमाग हाताचा पंजा लपेटला. अन् काही कळायच्या आत सगळा हातच मशनीत घुसला” हे सांगता सांगता सुरजितसिंगचे तांबूस डोळे विझू लागतात. नि त्या दुर्दैवी घटनेची कडवट याद काजळीगत नजरेत साकळते.
पासष्ठीतली कुलवंत कौर नवऱ्यानं अधुरी सोडलेली कहानी पूर्ण करते, “कडब्यागत हाताचा भुगा झालेला, सगळीकडं रक्ताचं थारोळं. ते बघून मला गरगरायला झालं. चक्कर येऊन मी बेशुद्ध झाले.” त्यानंतर वीस दिवस सुरजितनं इस्पितळात काढले. पण गप बसेल, झाल्या घटनेवर रडत बसेल अशातला हा इसम नव्हे. राबलं नाही तर कसं निभायचं, ही काळजीही होतीच. दिडेक महिन्यांतच सुरजितसिंग शेतावर हजर झाले. “बांधालगतचा शेतकरी बोंबलत आला, त्यानं ह्यांना अडवून पाहिलेलं. पण हा माणूस एका हातानं बोअरवेलची नटं आवळायला खड्ड्यात उतरलेला. एक हात गेला, पण हा माणूस कामाशिवाय बसलेला कधी मी बघितला नाही.” कुलवंत सांगतात.
“दोन्ही हात शाबूत असते, तर या माणसानं सोन्याचा वर्ख चढवला असता घराच्या भिंतींवर. असा मेहनती हा बाबा.” कुलवंत म्हणते.
सुरजितसिंग सारखे कित्येक आहेत, सत्तरच्या दशकातील शेतीतील यांत्रिकिकरणानं ‘छाटलेले’. हरितक्रांतीच्या गुलदस्त्याखाली निपचित झाकलेल्या अशा कहाण्या पंजाबच्या गावागावात भेटतील.

Vishav Bharti
केवळ पंजाबमध्येच १९७५ ते १९७८ दरम्यान कृषीयंत्राशी निगडीत ८४२ अपघात झालेत.
पंजाब कृषी विपणन मंडळामार्फत कृषक अपघातांचं सर्वेक्षण झालंय. त्यानुसार २००७ ते १२ दरम्यान ६,१९६ अपघातांची दखल घेतली गेलीय. पैकी ४,२१८ (६८.०८%) अपघात कडबा कुट्टी यंत्रानं झालेत. त्याखालोखाल नंबर येतो कम्बाइन हार्वेस्टर व थ्रेशर यंत्राशी निगडीत अपघातांचा, ते आहेत १,३९५ (२२.५१%) नि ५८३ (९.४१%) अपघात आहेत ट्रॅक्टर आदी यंत्राशी संबंधित.
कृषी विपणन मंडळानं दखल घेतलेल्या अपघातांचं विश्लेषण करणाराही एक अभ्यास आहे. हा अभ्यास केलाय पंजाब कृषी विद्यापीठ (लुधियाना) च्या फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनीअरिंग विभागानं. हा अहवाल अपघाती घटनांतील शारीरिक नुकसानींचं पृथक विश्वेषण करतो. या अभ्यासानुसार अपघातांच्या ६७.५ % प्रकरणात पिडितांची बोटं कडबाकुट्टी अथवा थ्रेशरमध्ये छाटली गेलीत. तर १८.२ % प्रकरणांत हाताचा पंजा नि १०.५% अपघातात अख्खा हात मशिनमध्ये गेल्यानं निकामी झाल्याचं दिसतं. हा अभ्यास २०१७ मध्ये कृषी अपघातांच्या बळींना मिळालेल्या नुकसान भरपाई निश्चितीवर बोट ठेवतो.
विपणन मंडळाची आकडेवारी ६,१९६ अपघातांची नोंद घेते, तर पंजाब कृषी विद्यापीठाचा अभ्यास त्याच कालावधीत (२००९ ते १२) प्रत्यक्षात ९,१८८ अपघात झाल्याचं नोंदवतो. तसंच २५० दशलक्ष रूपयांची नुकसान भरपाईची रक्कम ५,४९२ पिडीतांत विभागून वाटली गेल्याचं हा अभ्यास सांगतो. एकतर वास्तविक अपघातग्रस्तांची दखल घेण्यात कुचराई वर नुकसान भरपाई देतानाही हात आखडता घेतला गेल्याचं यातून दिसतं. प्रत्येक पिडीताला सरासरी केवळ ५०,००० रुपयेच नुकसान भरपाई मिळाल्याचं आढळतं. परिणामी ३,६९६ (४० टक्क्यांहून जादा) अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईच नाकारली गेल्याचं उघड होतं.
देशभर हरितक्रांतीचं वारं वाहू लागलं. नवनवीन यंत्रतंत्र साधन-संसाधनांचा शिरकाव शेतीत झाला. नि पाठोपाठ कृषक अपघातांचंही पेव फुटलं. पंजाबमध्ये क्वचित एखादंच गाव असेल, जिथं कृषक अपघात पिडीत नसतील. दु:खद गोष्ट म्हणजे, अशा प्रकरणात अपंगत्व आलेल्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खस्ता होत गेलीय. चंडीगढ स्थित इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड कम्युनिकेशनच्या अभ्यासातही हीच बाब अधोरेखित केली गेलीय. “अशा कुटुंबांच्या वार्षिक आर्थिक उत्पन्नात घट नि कायमचं शारीरिक निकामपण हा एक कळीचा आर्थिक प्रश्न आहे. हे अपघात पिडितांचं अवलंबित्व वाढवतात नि त्यांच्या दैनंदिन व्यवहारांवरही मर्यादा येतात.”
कृषक अपघात पिडितांसाठी नुकसान भरपाई धोरण आखणाऱ्या अग्रणी राज्यांपैकी पंजाब एक. भारतीय संसदेनं १९८३ मध्ये डेंजरस मशिन्स (रेग्युलेशन) ॲक्ट पारित केला. लगोलग वर्षभरातच पंजाबनं कृषक अपघात पिडितांसाठी नुकसान भरपाई अनुदान योजना जाहीर केली. पण १९८४ पासूनच या योजनेची अंमलबजावणी मात्र यथातथाच राहिलीय. सुरजितसिंगचं प्रकरण हे त्याचंच जितंजागतं प्रतीक.
सुरजितसिंगचं रंगीयाँ गाव पूर्वी पटियाला राजवंशाच्या अधिपत्यात होतं. त्याकाळी सरंजामी दडपशाही विरूद्ध लढलेलं हे गाव. पण नंतर याच गावात कृषक अपघातांनी अनेकांना घायाळ केलं. ही एक विचित्र शोकांतिकाच. गावातील कृषक अपघातांचे कित्येक पिडीत कुठल्याही मदतीशिवाय काळाच्या पडद्याआड गडप झाले. पण सुरजितसिंग शिवाय आणखीही एकजण गावात जिवंत आहे, ज्याचं अपघाती पंगुत्व नि त्या घटनेची सल अजून ठसठसतेय.
पाल सिंग, ७३ वर्षांचा बुजुर्ग. १९८२ तील तो प्रसंग सांगतात. या घटनेनं त्यांच्या हाताचा लचका तोडला. आजही ती घटना आठवली की, या मजबूत कास्तकाराचं अंग शहारतं. “सिख्ख दे हत्थाविच कडा रैंदा” (प्रत्येक शिखाच्या हातात कडा असतोच) “ओ केहो ज्या सिख्ख, जिसदे हत्थ विच कडा न होवे!’ हा कडाच मशनित गुतला न् पालसिंग जायबंदी झाले. ते म्हणतात, “मला स्वस्थ बसवत नाही. सारखं काही ना करावं वाटतं. त्यामुळं त्या दिवशी मी थ्रेशर मशिनचं ऑयलिंग करायला घेतलं. चालत्या थ्रेशरमध्ये तेल घालताना मनगटातला कडा आधी गुतला. अन् झपकन हाताचा पंजाच मशनित गेला. कडाड्कड् हाडांचा चक्काचूर झाला. काही कळायच्या आत माझा हात तुटून जमिनीवर पडलेला दिसला. जवळच हातातलं कडं वाकडंतिकडं होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं. ते बघून माझ्या जीवाचा जास्त ठणका झाला. “काश, कड्याऐवजी फक्त माझा हातच मशनित गेला असता, तो इतका बेढभ तर चेचला नसता.” पालसिंगची वेदना शिखांच्या हातातील जाडजुड कड्याइतकीच अजूनी खणखणीत आहे.
अपघातानंतर २०-२५ दिवस पाल सिंग हॉस्पिटलमध्ये होते. पण सुरजितसिंग प्रमाणेच हाही माणूस खमका. तोही विव्हळत बसला नाही. “मी दुसऱ्याच महिन्यात ट्रॅक्टरवर सवार झालो. ट्रॅक्टरनं नांगरणी-पेरणी तशी हाताचा मळ. पण आता मी लेव्हलिंगचं अवघड कामही हुशारीनं करतो. ते काम पहाटे चारलाच सुरू होतं, न् सोळा सोळा तास सलग चालतं. हे काम निगुतीचं. सतत ट्रॅक्टरचं व्हिल फिरवायला दोन हात पायजे, पण मी ते एका हातानं सहज करतो.”
या घटनेनं पाल सिंगचं आयुष्य पालटलं? नव्हे, त्यांना तसं वाटत नाही. ते म्हणतात, “जादा काही नाही, पण मला नेहमी वाटत राहतं, माझ्या निखळलेल्या हाताची मुठ घट्ट आवळलीय. न् काही केल्या तो तळवा उघडत नाहीए. एरवी मी माझ्या डाव्या हाताला इतकं तरबेज केलंय, की उजव्या हातानं काही केल्याचं आठवतही नाही.”

Vishav Bharti

Vishav Bharti
सुरजित व पाल सिंग पेक्षा नसीब कौरच्या वेदनेची प्रत वेगळी. ही सत्तरीतली बाई, एकाच गावात, एकसारख्या अपघाताची बळी. पण तिच्या वेदनेची ठसक जादा भळभळणारी. साधारण दहा वर्षांपूर्वी नसीब कौरचा हात कडबा कुट्टीत गेला. ती तो प्रसंग सांगते, “लहान होते, तेव्हापासून मी कडबा कुट्टी चालवलीय. मशिनवर चाऱ्याची छटाई मला सवयीची. पण तो दिवसच मनहूस होता, संध्याकाळचे सात वाजलेले. मी कुट्टीत कडबा घातला अन् अचानक माझं बोट रोलरमध्ये गेलं, अन् खचकन हातही गुतला. मी किंचाळले. ते ऐकून माझी सून जास्तच घाबरली, इंजिन बंद करायचं तिला सुचलंच नाही. आमच्या दोघींचे आवाज ऐकून शेजारपाजारचे आले अन् त्यांनी इंजिन बंद केलं. माझा हात मशिनमधून काढला, पण बाहेर आला फक्त रक्तामांसाचा लगदा...”
पण रंगीयाँ गावातील या तीन अपघात पिडीतांपैकी नसीब कौर किंचित नशीबवान. कारण तिलाच दरमहा १५०० रू. वृद्धा पेन्शन मिळतेय. पण हिलाही दिव्यांग पेन्शन किंवा नुकसान भरपाई मिळालेली नाही. या तिघांपैकी पाल सिंगनाच दरमहा १५०० रू. दिव्यांग पेन्शन मिळतेय. सुरजितसिंगना सरकारी योजनांचा लाभ शून्य. वृद्धावस्था पेन्शनचा लाभ मिळवणं सहजसोपं काम नाही. खेटे घालावे लागतात कचेरीचे, हा फॉर्म भर नि तो कागद काढ. त्यात तुम्ही वयोवृद्ध नि सोबत विकलांगही असाल, तर शामतच. कागदांची जुळवाजुळव नि अधिकाऱ्यांची वेळ मिळव हे जणू भयस्वप्न. ते करूनही अनेकदा सरकारी अधिकारी कुठल्याही सबबीशिवाय अर्ज नाकारतात.
नसीब कौर ते दिवस आठवून कुढत राहते, जेव्हा ती आपल्या हातानं वेणीफणी करायची. रोट्या थापायची. सगळा स्वैपाक एकहाती करायची. शिवाय दुधदुभतं बघायची. अशा एक ना हज्जार कामांची याद काढता काढता तिचा गळा दाटतो. हाताचं पांगुळपण तिच्या डोळ्यात साचतं. नि घटकाभर थांबून ती इतकंच म्हणते, “हु णं मै नि कर सक दीं!”

Vishav Bharti
“तुम्ही चपात्या लाटू शकता?” या प्रश्नाचं उत्तर द्यायला नसीबकौर सरसावते, “हो, नाही लाटून कसं चालेल. हां आता पहिल्यागत गोल गोल नाही होत रोटी. पण काय करणार? कुणास ठाऊक कुठल्या जल्माचं पाप फेडत्येय मी, की हे असलं जगणं नशीबी आलं.” तिचे डोळे भरून येतात. गालांवर ओघळलेले अश्रू पुसण्यासाठी तिच्या कडे एकच हात. त्या हातानं ती पांढऱ्या दुपट्ट्याचा सोगा चाचपू लागते. नि म्हणते, ‘अवघड असतं, वाईट घटनांची आठवण विसरून विसरता येत नाही.” नसीबकौरचा हुंदका फुटतो नि सुरजितची बायको कुलवंत तिला जवळ घेते. दोन्ही हातांनी कुरवाळत सांत्वन करते.
दु:खाचं मळभ दाटलेलं हे चित्र सुरजितसिंग पाहताहेत. ते सुस्कारा सोडत बाजेवरून उठतात. बैल बांधलेत त्या दिशेनं चालू लागतात. ते खुंटीला बांधलेल्या बैलाचा कासरा हाती घेतात. एकच हात, त्या हाताच्या बोटांनी ते कासऱ्याची गाठ सैल करू लागतात. अशावेळी त्यांनी गमावलेला दुसरा हातही जणू हालचाली करतोय. तो हात जाणवतो निमूट, निराकार, नसून असलेला अदृश्य हात!
हे वार्तांकन पारी सिनीअर फेलोशिप २०२५ च्या अंतर्गत प्रकाशित करण्यात आले आहे.
अनुवाद : प्रशांत खुंटे
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
Donate to PARI
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/in-punjab-green-revolution-red-harvest-mr

