रणदीप सिंग तितका नशीबवान नव्हता असंच म्हणावं लागेल. अमेरिकेहून अमृतसरच्या दिशेने निघालेल्या सी-१७ विमानात अटक करून, हातपाय साखळदंडात टाकून आणि विमानाच्या सीटला बांधून अनेकांना मायदेशी पाठवण्यात आलं. त्यात त्याची वर्णी लागली नाही. २६४ दिवस संपूर्णपणे अनोळखी असलेल्या भूमीत राहून अमेरिकेत जाण्याची खटपट करणारा रणदीप अखेर कंबोडियामध्येच मरण पावला. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी डंकी रुटने तिथे पोचण्याची धडपड यशस्वी झाली नाही.
परगट सिंग त्या मानाने बराच नशीबवान म्हणायचा. अमेरिकेचं स्वप्न उराशी बाळगलेला हा पंजाबी युवक आपल्या कुटुंबाची तीन एकर जमीन आणि आईचे जवळपास सगळे दागिने विकून अमेरिकेच्या दिशेने निघाला. पण त्यालाही त्या देशातून हाकलून लावून इथे परत पाठवण्यात आलं. तो मायदेशी परतला तो हातात बेड्या घालून. असेना का, त्याची कहाणी सांगायला आज तो आपल्यात आहे तरी.
पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातलं शेखपुरा कलां हे रणदीपचं गाव. घरात मयत झाल्यावर घरचे सगळे जण जमिनीवर बसतात. या प्रथेला सत्थर म्हणतात. ते दृश्य पाहिल्यावर रणदीपची चित्तरकथा काय होती ते जाणवत राहतं. दोन खोल्यांचं त्याचं छोटंसं घर त्याच्या मयतीला आलेल्या नातेवाइकांसाठी पुरं पडत नाही. त्याचं पार्थिव येण्याची सगळे वाट पाहतायत. पण त्यांना आणखी किती काळ वाट पहावी लागेल कुणीच सांगू शकत नाही. कारण कंबोडियातल्या भारतीय दूतावासाने ७,१०० डॉलर (अंदाजे ६,२१,००० रुपये) इतकी रक्कम आगाऊ भरायला सांगितली आहे. रणदीपचं पार्थिव त्याच्या घरी पाठवण्याचा हा खर्च आहे.
ही सहा आकडी संख्या रणदीपचे वडील बलविंदर सिंग यांच्या आकलनापलिकडची आहे. रोजंदारीवर काम करणारे बलविंदर काम मिळालं तर दिवसाला कसेबसे ५०० रुपये कमाई करतात. आलेल्या प्रत्येकाला ते ओळखत नसले तरी त्या प्रत्येकाकडे पाहून ते अगदी आशेने त्यांना हलक्या आवाजात सांगून पाहतात, “बॉडी ले के आउंदा देखो [मृतदेह इथे आणण्याचं काही तरी पहा].”
खेडोपाडी बेरोजगारी आणि शेतीवरील अरिष्टाचा विळखा असा घट्ट होत चालला आहे की पंजाबातून काही ना काही प्रकारे सुटका करण्यासाठी तरुणांचा आटापिटा सुरू आहे. २४ वर्षीय रणदीपही त्यातलाच एक. दलित कुटुंबात जन्म, नापिकी, बेरोजगारी आणि वाढत्या आत्महत्या अशा वातावरणात तो मोठा होत होता.










