२० वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम असे भोगावे लागतील, ही कल्पना देखील बाळासाहेब लोंढेंनी कधी केली नव्हती. पुण्यातील फुरसुंगीमधे एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरात लोंढेंचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच ते कुटुंबियांसोबत शेतात राबू लागले. ते कापसाची शेती करत. वयाच्या १८ व्या वर्षी अधिकच्या कमाईसाठी त्यांनी ट्रक चालवायला सुरवात केली.
"माझ्या एका मित्राने मला एका मुस्लिम कुटुंबाशी गाठ घालून दिली. त्यांचा गुरांची ने-आण करायचा व्यवसाय होता. त्यांना ट्रक चालक हवे होते आणि मी होकार दिला," ४८ वर्षाचे लोंढे सांगतात.
लोंढेनीं खूप मेहनत घेत धंद्यातल्या खाचाखोचा जाणून घेतल्या आणि जवळपास १० वर्षात त्यांच्याकडे पुरेसा अनुभव आणि पैसा जमा झाला.
लोंढे सांगतात- "मी आठ लाखात एक सेकंड-हँड ट्रक विकत घेतला. तरीही माझ्याकडे दोनेक लाख शिल्लक राहिले. १० वर्षात माझे आजूबाजूच्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी चांगले संबंध तयार झाले होते."
लोंढेची मेहनत सफल झाली, त्यांचा धंद्यात जम बसला आणि आणि धंद्यामुळे ते अवकाळी पाऊस, महागाई आणि कापसाचा कमी बाजारभाव या संकटांमधे देखील तगून राहिले.
त्यांचा व्यवसाय अगदीच सरळसोट होता. ज्या शेतकऱ्यांना त्यांची गुरे विकायची आहेत, त्यांच्याकडून आठवड्याच्या बाजारातून गुरे घ्यायची, आणि थोड्या जास्त किमतीत ती खाटकाला किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांना विकायची. २०१४ साली जवळपास १० वर्षे हा धंदा केल्यांनतर त्यांनी अजून एक ट्रक विकत घेतला.
पेट्रोलचा खर्च, ट्रकची डागडुजी, आणि चालकाचा पगार जाऊन लोंढे महिना १ लाख कमवत होते. ते अश्या व्यवसायामधे होते ज्यात परंपरागत कुरेशी मुस्लिम समाजाचा वरचष्मा होता. "त्याने कधीच फरक पडला नाही, उलट ते मला त्यांच्या ओळखी सांगायचे. माहिती द्यायचे. वाटू लागलं होतं की मी आयुष्यभरासाठी या धंद्यामधे राहू शकतो"








