"माझ्या आईचं नाव साळुबाई. ती वर्षांतून दोनतीनदा तरी गावकऱ्यांचे गोठे सारवायला जायची." गंगाधर गावातील जातीयता आठवतात. "मी आईच्या मागं मागं जायचो. मांगवाड्यातल्या तिघी-चौघी मिळून सवर्णांचा गोठा साफ करायच्या. घर, अंगण शेणानं सारवायच्या. मंग त्या घरची मालकीन पिठलं, किंवा वरणाचं भगुलं आईसमोर ठेवायची. दहा-पंधरा भाकरी आईच्या पदरात टाकायची. आईचं कष्ट मी पहायचो. पण त्याबदल्यात मिळणारी भाकर दूरूनच का देतात? ते कळायचं नाही."
गंगाधर पाहत होते, ती होती बलुतेदारीतली - 'मांगकी'. अर्थात मांग जातीची गावगाड्यातील जबाबदारी. भुमिहीन मांग वरील कामांशिवाय झाडू, कणग्या, दुरड्याही बनवत. त्याबदल्यातही गावातून अन्न मिळे. काळ बदलला तसतसं दलितांनी उदरनिर्वाहासाठी वेगवेगळे पर्याय शोधले.
"माझा बाप हातभट्टीची दारू गाळायला लागला. त्यामुळं चार पैशे मिळायला लागले." गंगाधर सांगतात, "पण एक दिवस गावठी दारू विकतो, म्हणून पोलिसांनी बापाला अटक केली. पोतराज असल्यानं बापाचे केस बायकांगत वाढलेले. ते पोलिसांनीच कापायला लावले. आणि बापानं दारूचा धंदा बंद करावा, म्हणून कोतवालकीचं काम दिलं."
बलुतेदारी कोलमडू लागली, नि कोतवाल हे नवं पद ग्रामीण प्रशासनात आलं. कोतवाल हा गावकामगाराच. फरक इतकाच, आधी बलुत्याच्या बदल्यात महार-मांग गावकऱ्यांसाठी राबत. आता ते किरकोळ मानधनावर कोतवाली करू लागले. गाव व शासकीय यंत्रणेत दुवा हे कोतवालाचं काम. तो एकप्रकारचा सांगकाम्याच. किंवा सरकारनं नेमलेला शिपाईगडी. गंगाधरच्या वडलांना हे काम मिळाल्यानं, नाही म्हंटलं तरी त्यांचा रूतबा वाढला. 'आपण एक पायरी वर चढलो!', या भावनेनं असेल, काशिनाथ पोळांनी आपल्या मुलांना शाळेत घातलं.
थोरला भाऊ व गंगाधरमध्ये जवळपास दहा वर्षांचं अंतर. मध्ये पाच बहिणी. ही सगळी पोरं शाळेत जाऊ लागली. बहिणी तिसऱ्या चौथ्या इयत्तेपर्यंत गेल्या. पण या दोन्ही भावांनी दहाव्या यत्तेपर्यंत मजल मारली. मांगकीचा जमाना गेला. या पोरांनाही वेगळं वळण लागलं. थोरले बंधू व स्वत: गंगाधर गरीबीमुळं जेमतेम दहावीपर्यंतच शिकू लागले. थोरल्या बंधूनं वडलांच्या जागी कोतवालकीचं काम सुरू केलं. गंगाधरला मात्र उदरनिर्वाहासाठी रस्ता सापडत नव्हता. तो किरकोळ मोलमजुरी करायला. नि बाकी वेळेत भीमगीतं गायचा.
गाण्याची गोडी गंगाधरला आपल्या आई व बहिणींमुळं लागली. गंगाधरची आई व बहिणींना देवदेवस्कीचं खुळ. त्या वेगवेगळ्या देवांचे उपवास धरत. गरीबांघरी महिला असे उपास धरून एकप्रकारे घराला हातभारच लावत असाव्यात. गंगाधर म्हणतात, "परभणी पासून ५० कि.मी. वर जिंतूर हे गाव. तिथला एक गोसावी होता. हा आपल्या शिष्यांबरोबर गावोगाव फिरायचा. हा गोसावी मुळचा महार जातीचा. इतर महारांसारखा तो बौद्ध झाला नव्हता. त्याच्याकडून माझ्या मायबहिणीनं भक्ती शिकून घेतली. आई व बहिणी रविवारी धुरपदामायचा उपास करत. सोमवारी महादेवाचा न् बुधवारी कृष्णाचा."