“कागद एकदम बरोबर असायचा. मशीनचं कसंय, कुठलं बटण दाबलं जातंय, कुणाला मत चाललंय, कुणाला माहित !”
तर, कलमुद्दिन अन्सारींचं स्पष्टच म्हणणं आहे की त्यांची पसंती इव्हीएमपेक्षा कागदावरच्या मतदानालाच आहे. पलामूच्या कुमनी गावात राहणारे ५२ वर्षीय अन्सारी गावातल्या मवेशी म्हणजेच गुरांच्या बाजारात आलेत. झारखंडमध्ये एप्रिलमध्येच उन्हाची काहिली आहे. त्यापासून बचाव म्हणून डोक्याला पांढरा गामचा गुंडाळलाय. ते १३ किमी चालत पाथारच्या गुरांच्या आठवडी बाजारात आपला बैल विकायला आले आहेत. “पैशाची नड आहे,” ते म्हणतात.
गेल्या साली (२०२३) त्यांचं भाताचं अख्खं पीक वाया गेलं. रब्बीला मोहरी पेरली पण तिनातला एक हिस्सा तर किडींनी फस्त केला. “२.५ क्विंटल मोहरी झाली. घेतलेले पैसे फेडण्यातच त्यातनं आलेला पैसा कर्ज फेडण्यात गेला,” अन्सारी सांगतात.
कलमुद्दिन याची चार बिघा (जवळपास तीन एकर) जमीन आहे आणि सध्या त्यांच्यावर गावातल्या अनेक सावकारांचं कर्ज आहे. “बहुत पैसा लेवा ले [त्यांनी खूप पैसे घेतलेत],” ते सांगतात. दर महिना शेकडा पाच रुपये व्याजाने त्यांचं कंबरडं मोडलंय. ते म्हणतात, “मी १६,००० रुपये कर्जाने घेतले होते आणि त्याचे २०,००० झालेत. त्यातले मी फक्त ५,००० फेडू शकलोय.”
मग त्यांच्याकडे एकच पर्याय उरला. आपला बैल विकायचा. “इस लिये किसान चुरमुरा जाता है. खेती किये की बैल बेचा गया,” कलमुद्दिन चाचा सांगतात. २०२३ साली बरा पाऊस येईल अशी त्यांना आशा होती.












