“तरुणपणी मी खूप सुंदर होते. पण आता मला माझ्याकडे पहायलाही वेळ नसतो,” नूर (नाव बदलले आहे) उसासा टाकत बोलत होती, ती ज्या घराच्या पायऱ्यांवर बसलीये ते तिनं भाड्यानं घेतलंय, अन् आता ती मोकळ्या वेळेत आराम करताना आमच्याशी बोलत होती.
नूर वयाच्या बावीसाव्या वर्षापासून काम करतेय. कधी तिनं बांधकाम साइटवर काम केलं तर कधी कारखान्यात. सध्याचं घरकाम धरण्यापूर्वी ती दिल्लीतल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सफाईचं काम करायची. “मी दिल्लीत येण्याच्या आधीपासून कामच करतेय,” तिनं पारीला सांगितलं.
रोहिणी सेक्टर १५ मधल्या हॉस्पिटलमध्ये नूर नर्सिंग आणि साफसफाई या कामांमध्ये मदत करायची. पेशंटची स्वच्छता राखणं, खोल्या स्वच्छ करणं, अन् कधी गरज पडली तर खाद्यपदार्थ किंवा पाणी आणून देणं अशी सगळी कामं तिच्याकडे असायची. कधीकधी नर्सला पेशंटला बँडेज बांधायला मदत लागायची किंवा पेशंटला काही मदत हवी असेल तर नूरला तिथं हजर रहावं लागायचं. “मी दिवसाला बारा-तेरा तास काम करायचे. महिन्याला ११,००० रुपये पगार मला मिळायचा. पण तो दिल्लीसारख्या शहरात पुरणारा नव्हता,” ती बोलत होती. “मला घरभाडं, लाइटबिट अन् पाणीबिल भरावं लागतं. हाच खर्च ९,६०० पर्यंत जातो,” नूरने सांगितलं.
२००४ मध्ये नूर तिची मावशी आणि नवऱ्यासोबत दिल्लीमध्ये आली. तेव्हा ती २१ वर्षांची होती अन् तिचं पहिलं बाळ पोटात वाढत होतं. बिहारच्या सुलिंदाबादमधलं हे कुटुंब कामाच्या शोधात राजधानीत आलं, जेणेकरून त्यांचं पोट भरू शकेल. नूरला चांगलं आयुष्य जगायचं होतं.
१९९१ ते २००१ या काळात दिल्ली-एनसीटीमध्ये स्थलांतरित होणाऱ्यांमध्ये बिहार दुसऱ्या क्रमांकावर होतं. पिरिऑडिकल फोर्स सर्व्हे (२०२४) चा डेटा सांगतो की ह्यात अजूनही काही बदल झालेला नाही. बिहारमधून ११ लाखांहून अधिक लोक दिल्लीमध्ये स्थलांतरित झालेत, सर्वेनुसार कळतं की, ही लोकं रोजगाराच्या शोधात इथवर आली.
दिल्लीत आल्यानंतर, नूरचं कुटुंब कश्मिरी गेटजवळ एका झोपडीत राहू लागलं. नुकतंच लग्न झालेली अन् गर्भवती असलेली ही तरुण पोर बांधकाम साइटवर मजूरीचं काम करू लागली. नंतर तिनं स्वरूप नगरच्या एका कारखान्यात काम केलं.








