गरीब नगरमधली हवा धुळीनं आणि दुःखानंही दाटून गेली होती.
मे १९ ते २३, २०२६ दरम्यान राबवण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत मुंबईतील पूर्व बांद्रातल्या सुमारे ५०० झोपड्या पाडण्यात आल्या. ही घरं रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची आणि घरेलू कामगारांची होती.
सगळीकडे ढिगारे पडले आहेत.
एका ताडपत्रीखाली आलिया शेख, रुखसार खान अफसर, अस्मा शेख आणि हिना खान एकत्र बसल्या आहेत. प्रामुख्याने मुस्लीम वस्ती असलेल्या या भागात, ज्या ठिकाणी त्यांची घरं होती, त्याच्या अगदी समोरच्या फूटपाथवर झोपत त्यांनी कित्येक रात्री घालवल्या आहेत.
१७ मे च्या संध्याकाळी, गरीब नगरच्या रहिवाशांना नोटीस मिळाली की बांद्रा जंक्शनच्या आसपासच्या सगळ्या वस्त्या दोन दिवसांत पाडल्या जाणार आहेत.
इथल्या बहुतांश रहिवाशांचा ईदचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला होता.
५२ वर्षीय गृहिणी आलिया ‘पारी’च्या वार्ताहरांना सवाल करतात, “इन्सान की इंसानियत कहाँ है?” त्यांच्या सुनेसाठी आणि नातवंडांसाठी खरेदी केलेले नवीन कपडे त्यांच्या बाकीच्या सामानासारखे तसेच राहिले.
















