मध्य भारतातील खरगोन शहरात एप्रिलचा उबदार दिवस होता. मध्य प्रदेशातील या शहरात रहिवाशांची पहाटेची कुजबुज येथील गर्दीच्या आणि गजबजलेल्या चांदणी चौक परिसरात कूच करून जाणाऱ्या बुलडोझरच्या एकसुरी आवाजाखाली अचानक दबून जाते. चिंताग्रस्त रहिवाशी आपल्या लहान दुकानांमधून आणि घरांमधून बाहेर पडतात.
वसीम अहमद, ३५, यांनी भयभीत होऊन अवघ्या काही मिनिटांत बुलडोझरच्या जाड स्टीलच्या पात्याखाली आपलं दुकान आणि त्यातील मौल्यवान साहित्य चिरडून नष्ट होताना पाहिलं. ते म्हणतात, “मी जे काही पैसे जमा केले होते ते मी माझ्या दुकानात ठेवले होते.”
राज्य सरकारने आदेश दिलेल्या बुलडोझरने ११ एप्रिल २०२२.रोजी केवळ त्यांचं छोटं दुकानच नाही तर खरगोनमधील या मुस्लिमबहुल परिसरातील सुमारे ५० दुकानं आणि घरं उपटून काढली. खासगी मालमत्तेचा हा नाश म्हणजे मध्य प्रदेशच्या राज्य शासनाने रामनवमीदरम्यान झालेल्या दगडफेकीत सामील असलेल्या "दंगलखोरांना" दिलेला प्रतिशोधात्मक न्याय होता.
पण, दगडफेकीत वसीम यांचा सहभाग होता याची शक्यता कमीच आहे - त्यांनी दोन्ही हात गमावले असून कोणाच्या मदतीशिवाय ते साधा चहादेखील पिऊ शकत नाही, उचलून दगड मारणं तर दूरच.
वसीम म्हणतात, “त्या दिवशी जे झालं त्याच्याशी माझा काहीही संबंध नव्हता.”
२००५ मध्ये एका अपघातात दोन्ही हात गमावण्यापूर्वी ते चित्र काढायचे. “एक दिवस, कामावर असताना मला विजेचा धक्का बसला आणि डॉक्टरांना माझे दोन्ही हात कापावे लागले. भयंकर खराब हालत असूनदेखील मी [दुकान उघडून] एक मार्ग काढला,” ते म्हणाले, स्वतःला कोसण्यात त्यांनी वेळ वाया घालवला नाही याचा त्यांना अभिमान आहे.








