पांगारा (पळस) फुलांनी बहरला आहे. नागालँडमधील मोन गावात ही गर्द लाल रंगाची फुलं वसंत ऋतूच्या आणि त्यासोबतच येणाऱ्या वार्षिक 'आओलेआंग' सणाच्या आगमनाची वर्दी देतात.
६२ वर्षांच्या न्येलेई कोन्याक त्यांच्या नातवासोबत इथे आल्या आहेत. त्या कोन्याक स्टुडंट युनियनच्या इमारतीच्या व्हरांड्यात बसून हसत म्हणतात, “मी इथं येऊन हे सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.” पण त्या ज्या गोष्टीची सर्वात जास्त वाट पाहत आहेत ती म्हणजे या सणाची मेजवानी. “मला सर्वात चवदार जेवण मिळणार आहे,” न्येलेई म्हणतात, “चिकट भात, मांस, चटणी आणि फळे.”
या उत्सवामध्ये गाणी, नृत्य आणि पारंपरिक खेळांचा समावेश असेल, ज्यामध्ये 'काँग-केई-हाम-अजाक मेक' म्हणजे बांबूच्या काठ्यांवर चालण्याची शर्यत, 'खाम तुत' म्हणजे मोठ्या लाकडी ढोलचे वादन आणि 'व्हेन खेन मेक' म्हणजेच पारंपरिक पद्धतीने अग्नी प्रज्वलित करणे यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
कोन्याक जमातीद्वारे साजरा केला जाणारा आओलेआंग हा सण सहा दिवसांपर्यंत चालतो. मार्च-एप्रिल या वसंत ऋतूच्या महिन्यांत हा सण आयोजित केला जातो, जिथे नवीन झूम शेतात बियाणे पेरल्यानंतर चांगल्या पिकासाठी देवाचा आशीर्वाद मागण्यासाठी संपूर्ण समुदाय एकत्र येतो. या भागात भात हे मुख्य पीक आहे आणि अजूनही मोठ्या प्रमाणावर फिरती शेती (झूम शेती) करण्याचीच प्रथा आहे.
कोन्याक लोक अजूनही गावातील वंशपरंपरागत प्रमुख म्हणजेच 'अंघ' आणि अलीकडच्या काळात निवडून आलेल्या सदस्यांच्या ग्रामपंचायतीला खूप मानतात. अंघ यांच्या घराशेजारील मैदानावरच सर्व कुटुंबे आओलेआंग किंवा स्थानिक लोक म्हणतात त्याप्रमाणे 'ओया' या वार्षिक उत्सवासाठी एकत्र आली आहेत.


