सकाळचे ११ वाजले होते. सोमेश्वर एकनाथ सलगर आंघोळ करून खोपीसमोर केस विंचरत बसले होते. नोव्हेंबर महिना सुरू झाला होता, साखर कारखान्याची धुराडी पेटली होती. फडकरी म्हणजेच ऊसतोड कामगार येण्यास सुरुवात झाली होती. पहाटे ४ वाजता सुरू झालेला सोमेश्वरभाऊंचा दिवस त्यानंतर थेट १२-१३ तासांनी संपणार.
सोमेश्वरभाऊ ऊसतोड कामगार म्हणजेच फडकरी आहेत. पारगावच्या वारणा कारखान्याच्या परिसरात ऊसतोड कामगारांच्या एका वस्तीवर लोकांची आवरासावर सुरू होती. बहुतेक कामगार मराठवाड्याच्या बीडसारख्या दुष्काळी प्रदेशातून कोल्हापूरसारख्या ऊसक्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात तोडीसाठी पुढचे चार-पाच महिन्यांसाठी स्थलांतर करून येतात.
बहुतेक कामगार मराठवाड्याच्या बीडसारख्या दुष्काळी प्रदेशातून इथे आलेत. सोमेश्वरभाऊ बीड जिल्ह्याच्या मुंगी गावाहून तीन दिवस, तब्बल ६५० किमीचा प्रवास करून ते कोल्हापूरला पोचले होते. उसाचं क्षेत्र या जिल्ह्यात सर्वात जास्त.
“माझी बायको परिमला सोबत आलीये. तिघं मुलं आहेत. प्रमोद, विनोद, दसरथ. आम्ही सर्व वंजारी आहोत.” सलगर कुटुंबाचा मुक्काम इथे एका खोपीत असणार आहे. गॅसचा सिलिंडर, धान्याचे कट्टे, संदूक त्या छोट्या खोपीत व्यवस्थित मांडलेल्या आहेत.
























