“भोगोल (शोलापासून बनवलेली कदम फुले) तर कुणीही बनवेल, पण मनसा देवीचा ‘ड्याला’ फक्त आम्हीच बनवतो,” तोंडात विडा दाबत अनेश्वरी बर्मन हसून सांगतात.
गुडघ्यापर्यंत खोचलेली साडी, केसांचा घट्ट अंबाडा; ५८ वर्षांच्या अनेश्वरी आपल्या साडीच्या पदराने हात आणि चेहरा पुसतात आणि अंगणातल्या नुकत्याच झाडून स्वच्छ केलेल्या सिमेंटच्या कट्ट्यावर विसावतात. या कसबी कारागिरीसाठी घरकाम आणि कलाकुसर यांचा मेळ घालणारा आणखी एक मोठा दिवस त्यांच्यासमोर उभा आहे.
जलाशयांमध्ये आढळणाऱ्या शोला (Aeschynomene aspera L) नावाच्या वनस्पतीच्या खोडापासून धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या वस्तू आणि शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. ही कला पश्चिम बंगालमधील अनेक प्रसिद्ध हस्तकलांपैकी एक आहे. उत्तर कोच बिहार जिल्ह्यातील ४,४६७ लोकसंख्या (२०११ ची जनगणना) असलेल्या सिद्धेश्वरी गावातील अनेक कुटुंबे आपली उपजीविका या शोला कलेवर भागवतात. मात्र, कोच बिहार-२ ब्लॉकमधील या गावातील अनेश्वरी यांच्यासारख्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कुटुंबांकडे 'मनसा ड्याला' बनवण्याचं वारसा हक्काने आलेलं कौशल्य आहे. ड्याला म्हणजे शोलाच्या मऊ आणि सच्छिद्र भागापासून बनवलेला एक साचा, ज्यावर सर्पदेवता मनसा देवीची प्रतिमा रेखाटलेली असते.
“जर तुमच्या कुटुंबात ही परंपरा नसेल, तर तुम्हाला हे बनवण्याची परवानगी नसते. पण आम्ही हे बनवू शकतो, कारण हे आमच्या रक्तात आहे,” त्या अभिमानाने सांगतात. ही परंपरा त्यांच्या पतीच्या कुटुंबाकडून त्यांच्याकडे आली आहे. हे कुटुंब राजबंशी समाजातील आहे (पश्चिम बंगालमध्ये हा समाज अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहे).

























