उत्तराखंड हा डोंगराळ प्रदेश. या प्रदेशात संपूर्ण लाकडी बांधकांची देवळं उभारणं ही खास कला. बलबीर विश्वकर्मांची या कारागिरीतली कारकिर्द दोन दशकांची. या वीस वर्षांत त्यांनी सात देवळं बांधलीत. या कामांतले बारकावे कोळून पिलेला हा माणूस.
“ये हमारा खानदानी काम है, बाप दादा के टाइम से,” असं म्हणत बलबीर आपला हातोडा-छिन्नी तापलेल्या देवदाराच्या लाकडावर ठेवतात. नि विसावा घेत 'पारी' सोबत बोलू लागतात.
२०२५ चा डिसेंबर. 'पारी'ची टीम जौनसारला पोचली. काष्ठकारिगरीचा भव्यतम आविष्कार समजून घ्यायला. तिथं महासू मंदिराचं बांधकाम आपल्या गतीनं सुरू होतं. डोंगरांआडून नुकताच सूर्योदय झालेला. सकाळच्या कोवळ्या उन्हांत देवळाचे कळस लकाकत होते.
"मंदिर बनाने की शुरुआत हमेशा नीचे से होती है, पहेले बेस बनेगा। फिर ऊपर का काम होगा। सबसे जरूरी है पिल्लर, जिसपे ढाँचा खडा होगा," देवळाच्या अर्ध्यानिम्म्या बांधकामाकडे पाहत बलबीर सांगतात.
लाकडी कशिदाकारीची मंदिरं झट की पट उभी राहत नाहीत. बलबीर या कारागिरीतले मुरब्बी. त्यांच्या देखरेखीत थाईना गावांतलं असं मंदिर पूर्ण व्हायला तब्बल नऊ वर्षे लागलेली. त्या मंदिरापेक्षा छोटं देऊळ असलं, तरी किमान एक-दोन वर्षं तरी लागतातच. कारण हे काम संयम नि निष्ठेनं करावं लागतं.























