“नैसर्गिक रंगांनी रंगवलेले कापड धुण्यासाठी वाहत्या नदीची गरज असते,” अब्दुल हलिम म्हणाले, “इथे तर हात धुवायला पाणी मिळत नाही!”
हलिम हे ब्लॉक प्रिंटिंग करणाऱ्या तिसऱ्या पिढीचा सदस्य आहेत, ते आपलं वर्कशॉप वाचवण्यासाठी कमी होणारा नफा आणि बनावट उत्पादने यांच्याबरोबर संघर्ष करत आहे. इंदोर शहरातल्या पाणी टंचाईमुळे त्यांना कापडावर लवकर पक्के होणारे रासायनिक रंग वापरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
ब्लॉक प्रिंटिंगसाठी डिझाइन काढलेले लाकडी ब्लॉक्स आधी लागतात. हलिम स्वतः ब्लॉकवर डिझाइन तयार करतात आणि नंतर ते ब्लॉक्स जयपूर, फारुखाबाद आणि फतेहपूर येथील ब्लॉक तयार करणाऱ्याकडे पाठवतात. सामान्यतः सागवान किंवा शिशमचे लाकूड ब्लॉक तयार करण्यासाठी वापरले जाते.
“हे ब्लॉक्स रंगात बुडवले जातात आणि मग ते कापडावर छापले जातात. “हा आमचा वारसा आहे,” असे म्हणत असताना हलिम चंदेरी ओढणीवर गुलाबाची फुले छापत आहेत. रंगाचा कोणताही डाग पडू नये म्हणून ते अतिशय काळजीपूर्वक काम करतात. छपाईसाठी ते जो रंग वापरतात तो रंग वापरण्यापूर्वी जुट, मलमल कॉटन आणि मच्छरदाणी सारख्या कापडातून ते तो रंग गाळून घेतात. हवामान कसे आहे, विशेषत: पावसाळ्यात रंग सुकणं फार त्रासदायक होते, त्यासाठी ७२ तास सुद्धा लागतात.














