“नाही करायचं आम्हाला स्थलांतर! इथून उठून कुठं जायचं आम्ही? बेघरांसारखं वणवण भटकावं लागेल आम्हाला,’’ मुन्नालाल कुर्मी सांगत असतात. ते सरसेला रयत या गावचे. शेतकरी. मध्य प्रदेशमधल्या दामोह जिल्ह्यात भारतातला ५३वा व्याघ्र प्रकल्प- ‘वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प’ (व्हीडीटीआर) उभा राहतोय. यात समाविष्ट होऊ घातलेल्या ९३ गावांमधलं सरसेला रयत हे एक गाव. यात एका नव्या पैलूची भर पडलीय : कोणत्याही क्षणी चित्तेसुद्धा इथे दाखल होऊ शकतात!
वाघांच्या अधिवासासाठी राखीव असलेल्या ५८ उद्यानांपैकी व्हीडीटीआर हे अगदी अलीकडचं! या ५८ पैकी तीन ठिकाणी चित्तेही आहेत. ही क्षेत्रं अगदी कडेकोट ‘राखीव’ आहेत; फक्त वन्य प्राण्यांसाठी!
हे ‘राखीव’ क्षेत्र जवळपास ८०,००० चौरस किलोमीटरवर पसरलेलं आहे. याचा अर्थ असा की भारतातल्या एकूण वनक्षेत्राच्या साधारणपणे १० टक्के भाग या ‘राखीव’ क्षेत्राने व्यापला आहे. फक्त वन्य प्राण्यांसाठी म्हणून हे ‘राखीव’ क्षेत्र निर्माण करण्याकरता एकूण २५७ गावांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. वर्षानुवर्षं पिढ्यान् पिढ्या राहणारी कुटुंबं त्या प्रक्रियेत आपली घरंदारं सोडून दुसरीकडे विस्थापित झाली आहेत, अशी माहिती केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी डिसेंबर २०२५ मध्ये लोकसभेत दिली आहे. हे थोडं म्हणून की काय; या राखीव क्षेत्राच्या हद्दीत वसलेली आणखी ७३० गावं तिथून हटवली जाणार आहेत.
दामोह जिल्ह्यातलं दाबा हे गावही असंच नवीन अभयारण्याच्या घशात जाणार आहे. “कुठे राहायचं आम्ही? आणि खायचं काय?’’ नौरदेही अभयारण्याच्या सीमेवर वसलेल्या या दाबा गावच्या राधा राणी गोंड विचारतात. हिवाळ्याच्या कोवळ्या उन्हात त्या आपल्या घराच्या अंगणात बसल्यात. नुकत्याच हाती आलेल्या गव्हाच्या पिकावरून हात फिरवत आपल्याशी बोलत असलेल्या या ७५ वर्षीय राधा राणी गोंड. अस्वस्थ मनातली व्यथा बोलण्याच्या ओघात त्यांच्या शब्दातून उमटत राहते.
अभयारण्यं निर्माण करण्यात आलीयेत ती ‘किल्लेवजा संवर्धन’ या आधारावर! यातून वन्यजीवांसाठी असलेली विशिष्ट संरक्षित क्षेत्रं उभी करण्यात आली. माणूस आणि वन्य जीव यांच्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कडेकोट भिंती बांधून त्यांना एकमेकांपासून अलग करायचं, या संकल्पनेचा जोर त्यामागे! पर्यावरणशास्त्रज्ञांच्या मते मात्र हे सारं एका अतिसुलभ कथानकावर आधारित आहे. वाघ आणि माणसं यांचं सहजीवन शक्य नाही असं यात मानलं जातं. वस्तुस्थिती खरंतर अशी आहे की, भारतामधल्या जंगलात राहणारे समुदाय नेहमीच वन्य प्राण्यांच्या सोबत राहत आलेत. “जंगलांना, प्राण्यांना पिढ्या न् पिढ्या आम्ही सांभाळत आलोय. आता आम्हाला इथून हाकलून लावणार आणि इथे; याच ठिकाणी ते पर्यटकांसाठी अतिथीगृह बांधणार!” जानकाबाई सांगत असतात. उमरावन हे त्यांचं गाव. २०१५ साली पन्ना व्याघ्र अभयारण्याची व्याप्ती वाढवण्यात आली. त्या व्याप्तीने जानकाबाईंचं उमरावन गाव अक्षरक्ष: गिळंकृत केलं.























