"झारखंडच्या हिजला गावात एक मोठं साखू गाच [झाड] होतं. गावातले आणि आसपासचे लोक त्या जागी जमायचे अन् बैसी [सभा] घ्यायचे. इंग्रजांच्या लक्षात आलं की लोक रोज ह्या झाडाच्या भवताली जमतात, त्यामुळे इंग्रजांनी ते झाड तोडायचं ठरवलं अन् ते तोडलं देखील. त्यातून रक्त (झाडामधून निघणारा द्रव पदार्थ) वाहिलं. त्यानंरच या झाडाचा बुंधा केवळ दगड बनून राहिला."
झारखंडच्या दुमका जिल्ह्यातल्या या गावातला राजेंद्र बास्की झाड होतं त्याच ठिकाणी बसून ही शेकडो वर्षे जुनी गोष्ट सांगत होता. "त्या झाडाचा बुंधा, आता मारांग बुरू देवतेची पूजा करायची पवित्र जागा झाली आहे. झारखंड, बिहार आणि बंगालमधून संथाल आदिवासी इथे दर्शन आणि पूजेसाठी येतात." ३० वर्षांचा बास्की शेतकरी आहे आणि सध्या मारांग बुरूचा नायकी (पुजारी) म्हणून काम पाहतो.
हिजला गाव दुमका शहराबाहेर, संथाल परगणा विभागात येतं. २०११ च्या जनगणनेनुसार इथली लोकसंख्या ६४० आहे. प्रसिद्ध संथाल हुल म्हणजे ब्रिटिश राज्यकर्त्यांविरोधात संथालांनी पेटवलेला उठाव, ३० जून १८५५ रोजी भगनाडीह गावाचे सिडो आणि कान्हू मुर्मू यांच्या नेतृत्वात सुरू झाला होता. ते गाव हिजलापासून जवळपास शंभर किलोमीटर दूर आहे.










