रुजलुक सु यारसु थाय गोव बहनाई आंथे आंथे, एक दम ओ पशा थाय गोव हमला आंथे आंथे…
(तो आला आणि सबबी देऊन निघून गेला, त्याने पाहिले मला आणि तो निघून गेला
मित्र माझा फक्त निमित्त देऊन निघून गेला, त्याने पाहिले मला आणि तो निघून गेला)

Bandipore, Jammu and Kashmir
|THU, AUG 21, 2025
Author
Editor
Photo Editor
Translator
रुजलुक सु यारसु थाय गोव बहनाई आंथे आंथे, एक दम ओ पशा थाय गोव हमला आंथे आंथे…
(तो आला आणि सबबी देऊन निघून गेला, त्याने पाहिले मला आणि तो निघून गेला
मित्र माझा फक्त निमित्त देऊन निघून गेला, त्याने पाहिले मला आणि तो निघून गेला)
एकीकडे फरीद अहमद लोन यांची नजर किशनगंगा नदीकडे एकटक लागलेली असते आणि ते जम्मू आणि काश्मीरच्या दर्द-शिन समाजातले प्रसिद्ध कवी गुलाम रसूल मुश्ताक यांच्या ओळी हळुवारपणे म्हणत असतात.
आम्ही नदीच्या काठावर बसलो आहोत आणि पाहतोय की पाण्यावर बर्फाचे पातळ थर जमू लागले आहेत, काही छोटे तुकडे वाहत जात आहेत. नदी अजून पूर्ण गोठलेली नाहीये, पण तिचं रूप बदलतंय. ऋतू बदलणार आहे... बदलतोय.
थोड्याच अंतरावर स्थानिक महिला लाकडाची आणि गवताची मोळी उचलून नेत आहेत ज्याचं वजन सुमारे २५ ते ३० किलोपर्यंतसुद्धा असू शकतं. दुसरी एक महिला शेण भरलेली बादली घेऊन जात आहे, जे हिवाळ्यात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक 'दान' चुलीसाठी इंधन म्हणून साठवलं जातं. आमच्या भोवती असलेले गुरेझ खोऱ्याला भेट देण्यासाठी आलेले पर्यटक आता हळूहळू परतत आहेत.
फरीद ऋतू हळूहळू बदलत असल्याकडे संकेत करतात, जे फक्त नदीकडे पाहून नाही, तर सबंध गुरेझ खोरं हिवाळ्यासाठी ज्याप्रकारे तयारी करतं त्यातही दिसू लागतात. फरीद स्वतः दर्द-शिन समुदायाचे आहेत आणि सांगतात की या समाजातील बहुसंख्य लोक आणि २०११ च्या जनगणनेनुसार ३७,९९२ दार्दिक लोक हे गुरेझ खोऱ्यातच राहतात.

Muzamil Bhat

Muzamil Bhat

Muzamil Bhat

Muzamil Bhat
ऑक्टोबरपासून हिवाळा सुरू झाला की संपूर्ण खोऱ्यावर बर्फाची चादर पसरते. ६८ वर्षीय फरीद सांगतात, “फक्त वयस्करच इथे थांबतात,” बर्फामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं जवळपास अशक्य होतं. “त्यामुळे जे राहतात, ते बहुतेक वेळा घरातच असतात.”
कधीकधी या खोऱ्यातल्या काही भागांत १५ फूट जाडी इतका बर्फ साचतो आणि संपूर्ण भाग राज्याच्या इतर भागांपासून जवळपास सहा महिने वेगळा होतो. त्यामुळे जवळजवळ ८० टक्के लोक स्थलांतर करतात. “काही लोक काश्मीरच्या इतर भागांत निघून जातात, तर काही हिमाचल प्रदेश किंवा पंजाबसारख्या राज्यांत मजुरीकाम करण्यासाठी निघून जातात,” बागायती विभागाचे निवृत्त वरिष्ठ तंत्रज्ञ फरीद सांगतात. जे काश्मीरमध्येच राहतात, ते लहान हॉटेल्समध्ये स्वयंपाक्यांसोबत किंवा श्रीनगरमधील 'हरिसा' दुकानांमध्ये काम करतात. (वाचा: श्रीनगरमध्ये : हरिसाच्या गरम वातावरणाची गोष्टच वेगळी)
तीव्र हिवाळा, वेगानं आणि सतत बदलणारं अतिशय टोकाचं हवामान हे इथलं कायमचं आव्हान आहे. २५ जानेवारी २०१७ मध्ये, गुरेझमध्ये चार हिमस्खलनं झाली, ज्यात माजगुंडनीरू गावात (फरीद यांच्या दावर या गावापासून सुमारे २६ किमी अंतरावर) २० सैनिक आणि ४ नागरिकांचा मृत्यू झाला.
फरीद तो काळ आठवतात जेव्हा गुरेझमध्ये प्राथमिक वैद्यकीय मदत मिळणंही दुरापास्त होतं. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला, जवळच्या मर्कूट गावातील मौलवीसाहेब आजारी पडले. तेव्हा बर्फ १२ ते १५ फूट उंची इतका खोल होता. “लोक त्यांना खाटेवर उचलून घेऊन गेले.” फरीद सांगतात. बंदीपोरा गावातल्या रुग्णालयात पोहोचायलाच त्यांना दोन दिवस लागले होते जे गावापासून ८६ किमी दूर होतं.
आणखी एका प्रसंगात, एक उस्ताद मोहतरम (शिक्षक) यांची मुलगी बाळंत होती. तेव्हा नागरिकांसाठी हेलिकॉप्टरची सोय नव्हती आणि रुग्णालयात नेण्यासाठी एक लाख रुपये खर्च आला असता. तेव्हा भारतीय सैन्यानं पुढाकार घेतला आणि मदत केली. “आर्मीने त्यांच्या सद्भावना मोहिमेद्वारे मदत करायला सुरुवात केली.”
आज परिस्थिती काही प्रमाणात सुधारली असली, तरी जम्मू आणि काश्मीरमध्ये अनुसूचित जाती-जमातीमध्ये समाविष्ट असलेला हा समुदाय अजूनही आपत्कालीन स्थितीत पूर्णपणे लष्करावरच अवलंबून आहे. आणि बाळंतपण व प्रसूती ही अजूनही एक मोठी समस्याच आहे.

Muzamil Bhat

Muzamil Bhat
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषा (LoC) इथून फारशी दूर नसल्यामुळे हंगामी स्थलांतरासोबतच सीमापार होणार गोळीबार हा सुद्धा त्यांच्या समुदायासाठी नेहमीच एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.
फरीद छावणीच्या आसपास फिरत असताना अचानक थांबतात. “या रस्त्याचं चित्र अजूनही माझ्या डोळ्यांसमोर तितकंच ताजं आहे,” ते म्हणतात. “२००५ साल होतं. आमच्या गावातले बाप-लेक मेंढ्या चरायला म्हणून घेऊन गेले होते. या पुलावरूनच गावात येणार होते,” असं म्हणत ते रस्त्याच्या दुसऱ्या टोकाकडे बोट दाखवतात.
“बाप मागे, आणि मुलगा पुढे असे दोघे चालत होते,” फरीद तेव्हा जवळच्या मशिदीत होते आणि दूरवरून हे दोघं त्यांना दिसत होते. तेव्हा त्यांच्या डोळ्यांदेखत त्या दोघांवर अचानकपणे बॉम्ब पडला. तेवढ्यावरच हे थांबलं नाही, तर त्याच दिवशी त्यांच्या घरातील मुलगी परीक्षेसाठी बाहेर पडली होती, ती देखील लष्कराच्या छावणीजवळ झालेल्या आकस्मिक गोळीबारात बळी पडली, फरीद सांगतात.
कंप सुटलेल्या आवाजात ते पारीला सांगतात, “एकाच दिवशी घराततील एकाचा मुलगा गेला, तर एकाची मुलगी.” त्या गोळीबारात २० ते २५ लोकांचे जीव गेले आणि अनेक जनावरेही मरण पावली.
एका घटनेत तर तुलेल बाजारपेठ संपूर्ण उध्वस्त झाली. तिथं उभ्या असलेल्या एका बसमध्ये गोळीबार झाला आणि आग लागली. फरीद सांगतात, “आग इतकी वेगाने पसरली की काहीच शिल्लक राहिलं नाही. त्या काळी तर बहुतांश घरे लाकडाचीच होती.”
कोण स्वतःहून इथे मरण पत्करेल? अशा ठिकाणी राहण्याची कुणाची इच्छा असेल?” फरीद विचारतात. ते स्वतः आता पत्नी, चार मुलं आणि तीन मुलींसह दावरमध्ये राहतात, जे तुलेल खोऱ्यात जाण्यापूर्वीचं शेवटचं बाजारपेठेचं ठिकाण आहे.

Muzamil Bhat

Muzamil Bhat
पूर्वीही गुरेझमध्ये उत्पन्नाचे फारसे मार्ग नव्हते. “लोक गुरं चारून किंवा लष्करात हमाल म्हणून काम करून आपलं पोट भरायचे,” असं फरीद सांगतात. प्रत्येकाकडे घोडे असायचे आणि “नोकऱ्यांच्या संधी तर फारच कमी होत्या.” अनेक लोक पट्टू विणकामात गुंतलेले होते, जी त्या समाजाची पारंपरिक कला होती. (वाचा: पट्टू विणकरांचे उध्वस्त होत जाणारे जीवन)
जेव्हा लोक खोऱ्याच्या इतर भागांत गेले, तेव्हा त्यांना चांगल्या नोकऱ्या, शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळाल्या. त्यामुळेच, लोकांनी बांडीपुरा, कंगन, गांदरबल श्रीनगर आणि मध्यवर्ती भागात स्थलांतर करून रहायला सुरुवात केली.
अधिकाधिक लोकं जसजसे बाहेरच्या भागात स्थलांतरित होऊ लागले, तसतसं त्यांचं मातृभाषेत बोलणं कठीण होऊ लागलं. जेव्हा दर्द-शिन लोक बांडीपुरा बाजारात खरेदीसाठी जातात तेव्हा अनेकजण त्यांच्या स्वतःच्या म्हणजेच शिना भाषेत बोलतच नाहीत. “त्यांना एक प्रकारचा न्यूनगंड वाटतो. कदाचित आपण वेगळे आहोत, असं वाटतं असेल.”
पूर्वी मात्र हे असं नव्हतं. “मी लहान असताना सर्वजण शिना भाषेतच बोलायचे,” फरीद सांगतात. “पण आता मी बाजारात गेलो की आमच्याच समाजातील तरुण उर्दू, हिंदी, काश्मिरी आणि कधी कधी इंग्रजीत सुद्धा बोलताना दिसतात.”
शिना ही दर्दिक भाषा असून ती इंडो-आर्यन भाषाकुलातली आहे. युनेस्कोने ती अजूनतरी लुप्त होत जाणाऱ्या भाषांमध्ये नोंदवलेली नसली, तरीही ती भाषा बोलणारे लोक झपाट्याने कमी होत चालले आहेत. सध्या तिला 'अविकसित पण अजून जिवंत' अशा असुरक्षित भाषांच्या यादीत ठेवण्यात आलं आहे.
गेल्या ४० वर्षांपासून, फरीद हे हब्बा खातून सांस्कृतिक समूहाचे सदस्य म्हणून आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत. गुरेझमधील स्थानिक लोक या समूहाला मदत करतात आणि काही वेळा विविध माध्यमातून त्या भाषेत केलेल्या सादरीकरणासाठी मानधनही दिलं जातं. हा समूह शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन समाजाच्या भाषा आणि संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करतो.

Muzamil Bhat

Muzamil Bhat
पण हे प्रयत्न टिकवून ठेवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. इथली जवळजवळ सगळी मुलं गुरेझखोऱ्याच्या बाहेर जाऊन शिक्षण घेतात, त्यामुळे ज्यांच्याकडून शिकावं असं इथलं, जवळचं कुणीही नाही. “शाळांमधली सकाळची प्रार्थना, पाठ्यपुस्तकं आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्वच उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये घेतले जातात.” फरीद म्हणतात, “जेव्हा मी शाळांमधल्या कार्यक्रमांत शिना भाषेतील गाणी म्हणतो, तेव्हा बहुतेक विद्यार्थ्यांना त्यांचा अर्थच समजत नाही.”
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनासारखे मुख्य कार्यक्रम काश्मिरी आणि उर्दू भाषेतच घेतले जातात. “पण आता आमच्या समूहाने ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हे कार्यक्रम आम्ही आमच्या मातृभाषेत घेण्याचा प्रयत्न करतो, लोकगीते आणि कविता यांचाही समावेश करतो,” ते सांगतात.
*****
“तुम्हाला ‘चौक’ म्हणजे काय हे माहिती आहे का?” तारिक परवेज लोन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारतात. सगळेच त्यांच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहतात. “ते काय असतं, सर? कसं दिसतं?” वानपोरा सरकारी हायस्कूलमधला एक उत्सुक विद्यार्थी विचारतो. मुख्याध्यापक फळ्यावर एक अपरिचित आकृती काढायला लागतात आणि म्हणतात, “हा हातमागाचा एक प्रकार आहे. आपल्या पूर्वजांनी याचा वापर लोकरीचे कपडे बनवण्यासाठी केला होता.”
तारिकचालूअसलेलीचर्चापुढेनेतफळ्यावरएकभोवऱ्यासारखी आकृती काढतात. “शिना भाषेत याला काय म्हणतात?” ते विद्यार्थ्यांना विचारतात. एक मुलगा म्हणतो, ‘लट्टू’ – जो काश्मिरी भाषेतील शब्द आहे. काही क्षण शांतता पसरते. मग तारिक सांगतात, “त्याला आपल्या शिन भाषेत ‘थुरकैती’ म्हणतात.”
हीचर्चात्यांनीतशीचपुढेचालूठेवली, पण३०विद्यार्थ्यांच्या वर्गात केवळ एकाच विद्यार्थ्याला शिना भाषेत या वस्तूंची नावे माहित होती. “अशा कितीतरी शब्दांचा वापर आपण आता विसरलो आहोत,” तारिक सांगतात, “कारण आपण इतर भाषांशी जुळवून घेतलं आणि पण आपलीच बोलीभाषा मागे पडली.”

Muzamil Bhat
गुरेझमधील मुले जेव्हा शिक्षणासाठी किंवा इतर काही कारणांनी घराबाहेर पडतात, तेव्हा शाळांमध्ये रोजच्या संवादासाठी त्यांना उर्दू आणि काश्मिरीसारख्या इतर भाषा शिकाव्या लागतात. याव्यतिरिक्त बहुतेक मुले हिंदी आणि इंग्रजी देखील शिकतात.
तारिक सांगतात, “जे मूल वर्षाचे पूर्ण १२ महिने गुरेझमध्ये असतं, त्याला भाषेबाबत कधीच अडचण येत नाही.” पण जी मुलं काम, शिक्षण, आजारपण किंवा बदलतं हवामान या कारणांमुळे स्थलांतरित होतात त्यांना सहजपणे आपल्या मातृभाषेत बोलणं कठीण जातं.
तारिक बोलत असताना त्यांची एक सहकारी शिक्षिका लगेच म्हणते, “माझी धाकटी मुलगी उर्दू स्वतःच शिकली - फोनवर व्हिडीओ पाहून.” त्यांनी काही तिला ही भाषा शिकवली नव्हती. पण जेव्हा त्या तिला शिना भाषा शिकवायचा प्रयत्न करतात, तेव्हा मुलगी फारसा उत्साह दाखवत नाही. गेल्या वर्षभरातच तिने ही भाषा थोडी थोडी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. तिची मोठी मुलगी मात्र शिना भाषेत बोलते कारण ती अशा शाळेत जाते जिथे मातृभाषेत शिक्षण दिलं जातं.
तारिक यांचं मत असं आहे की आपल्याला आपली भाषा जर जिवंत ठेवायची असेल, तर ती घरात आणि बाजारात संवादासाठी वापरणं अत्यावश्यक आहे. ते म्हणतात, "मी काही काश्मिरी आणि उर्दू भाषा शिकण्याविरोधात नाहीये, कारण ती मुलांना गुरेझच्या बाहेर जाऊन इतरांशी संवाद साधण्यासाठी उपयोगीच पडणार आहे.” पण आपली भाषा विसरणं म्हणजे आपली ओळख विसरणं हेही तितकंच खरं आहे,” असंही ते आवर्जून सांगतात.
पण या समाजातील अनेक विद्यार्थ्यांना आपली दर्दिक संस्कृतीची ओळख उघड करणं असुरक्षित वाटतं, कारण त्यांना भीती असते की त्यांना 'दर्दे' या नावाने हिणवून बोललं जाईल (हा शब्द अनेकदा उपेक्षेने वापरला जातो).

Muzamil Bhat

Muzamil Bhat
*****
गुरेझ खोरे म्हणजे एके काळी काश्मीरमधील लोकांसाठी रेशीम मार्ग (सिल्क रूट) होता. लोक बांडीपुऱ्याहून गुरेझमार्गे गिलगिटपर्यंत व्यापार आणि यात्रेसाठी जात असत. हाच मार्ग हज यात्रेकरूही वापरत असत.
गुरेझ आणि द्रास भागातील दर्द-शिन जमातीची सांस्कृतिक आणि भाषिक पाळंमुळं दर्दिस्तान या प्रदेशामध्ये आहेत जो एकेकाळी काश्मीर खोऱ्यापासून गिलगिट आणि अफगाणिस्तानपर्यंत पसरलेला ऐतिहासिक प्रदेश होता “काश्मिरी आणि दर्द लोकांमधील संबंध हे १९४७ मधील फाळणीच्याही खूप आधीपासूनचे आहेत,” असं मसूद अल हसन समून सांगतात. “फाळणी तर काल-परवाची गोष्ट आहे.” ७३ वर्षीय मसूद समून हे जम्मू-काश्मीर सरकारचे माजी शिक्षण संचालक आहेत. “दर्द लोक शतकानुशतकं जम्मू-काश्मीरमध्ये रहात आलेत,” ते सांगतात.
१२व्या शतकातील काश्मिरी इतिहासकार कल्हण यांनी ‘राजतरंगिणी’ या संस्कृत काव्यात्मक इतिहासग्रंथात गुरेझमधील दर्द लोकांचा उल्लेख केला आहे. मसूद सांगतात की गुरेझचे राजे खोऱ्यातल्या शासकांशी नेहमीच युद्ध करत असत. दर्द समुदाय आणि राजा हर्ष यांच्यात ददकथ पर्वतावर झालेली एक लढाई विशेष प्रसिद्ध आहे (हा हर्ष म्हणजे भारतातील हर्षवर्धन नव्हे).
शिना भाषेला स्वतःची अशी स्वतंत्र लिपी नसल्यामुळे ती मौखिक परंपरा, लोककथा आणि लोकगीतांच्या माध्यमातूनच आजतागायत टिकून आहे. पण गेल्या अनेक दशकांत हवामानांतील बदलांमुळे होणारी स्थलांतरे, सीमावर्ती गोळीबार, आणि राजकीय-सांस्कृतिक अस्थिरता यामुळे हा समाज आपल्या मातृभाषेपासून अधिकाधिक दूर जात आहे.
“जेव्हा तुम्ही श्रीनगरला जाता आणि ५० घरांपैकी फक्त एका घरात शिना बोलली जाते, तेव्हा ती भाषा जिवंत राहील तरी कशी?” असा प्रश्न समून उपस्थित करतात. त्यांच्या समाजातील मुले एकमेकांशी काश्मिरी किंवा इतर प्रचलित भाषांमध्येच संवाद साधतात. ते म्हणतात की कदाचित पुढच्या एका पिढीपर्यंत शिना भाषा बोलली जाईलही, पण दुसऱ्या पिढीत ही भाषा लोप पावलेली असेल.
मसूद सध्या शिना भाषेसाठी एकसंध व प्रमाणित लिपी तयार करण्याचं काम करत आहेत. ते उत्तर काश्मीरमधील बांडीपुरा भागात राहतात. “आत्तापर्यंत शिना भाषेसाठी दोन लिपी तयार करण्यात आल्या - एक जॉर्ज अब्राहम ग्रिअरसन यांनी तयार केलेली रोमन लिपी आणि दुसरी नस्तालिक उर्दू लिपी जिचं नाव आहे ‘गिलगिट और शिना ज़बान’ ही डॉ. शुजा नामूस (गिलगिट, पाकिस्तानचे जिल्हा शिक्षण अधिकारी) यांनी लिहिलेली होती.”
पण या दोन्ही प्रयत्नांत लेखन केवळ संशोधनापुरते मर्यादित राहिले. ग्रिअरसन आणि डॉ. नामूस यांपैकी कोणीही मूळ शिना भाषिक नव्हते. त्यामुळे त्यांना भाषेच्या उच्चारणसंबंधी अनेक बारकावे नीट टिपता आले नाहीत.
मसूद सांगतात की शिना भाषेत चार विशिष्ट व्यंजनध्वनी आहेत, “जे डाव्या-उजव्या इतर कोणत्याही भाषेत नाहीत — उर्दू किंवा फारसी तर सोडाच, ती काश्मिरीतही सापडत नाहीत.” त्यामुळे या उच्चारांसाठी वेगळं चिन्ह वापरणं आवश्यक होतं, पण कोणीही त्यात यश मिळवू शकलं नाही. ते पुढे सांगतात की, नंतर पाकिस्तानमधील काराकोरम विद्यापीठाचे प्राध्यापक मोहम्मद अमिन झिया यांनी शिना भाषेचे व्याकरण आणि नियम लिहिले, त्या काळात संगणक नुकतेच आले होते. पण त्यांच्या कामातही लिपीवर विशेष भर नव्हता.
तारीक हे मसूद यांच्या मताशी सहमत आहेत. ते सांगतात, “जर लिपीच नसेल, तर आपण ही भाषा कशी लिहिणार आणि शिकविणार?” शिना भाषेच्या व्याकरणावर पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर, अनेक समाजबांधवांनी व्हॉट्सॲप ग्रुप देखील तयार केला होता, पण तोही फार काळ टिकला नाही,” असं ते म्हणतात.
फरीदही म्हणतात, “एक योग्य लिपी असली, तर ती उपयोगी ठरेल, कारण आजही बहुतांश शिना साहित्य उर्दूत लिहिलं जातं.” नवीन लिपीमुळे मुलांना आपल्या मातृभाषेशी अधिक जवळीक वाटेल. ते पुढे सांगतात, “जेव्हा आपली मुलं काश्मीरहून रशिया किंवा जर्मनीसारख्या देशांत जातात, तेव्हा आपण त्यांना त्या परदेशी भाषा इथूनच शिकवून पाठवत नाही ना? तिथं जाऊनच ती ते भाषा शिकतात, आत्मसात करतात.”

Muzamil Bhat

Muzamil Bhat
मसूद ठामपणे सांगतात की, भाषेला जिवंत ठेवण्याचा एक मूलभूत आधार म्हणजे त्या भाषेत असणारं साहित्य. ते काश्मिरी साहित्याचे दाखले देतात : लल देद, शेख-उल-आलम (नंद ऋषी म्हणूनही ओळखले जाणारे) यांचं साहित्य आणि इतर अनेक कवींच्या कविता, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील लेखन जे आजही वाचलं जातं. आजही काश्मिरी भाषेत बरंच गद्य आणि पद्य अशा दोन्हीही प्रकारांमधलं चांगलं साहित्य निर्माण होतंय, त्यामुळे ती भाषा टिकून राहील, असं ते म्हणतात. “पण शिनासाठी मात्र आपण असं म्हणू शकत नाही.”
१९७५ साली, जेव्हा मसूद काश्मीर विद्यापीठात उर्दू आणि फारसी शिकवण्याचं पूर्णवेळ काम करत होते, तेव्हा शिना भाषेसाठी एक वेगळी लिपी तयार करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. “मी लोककथा आणि लोकगीते संकलित करत होतो,” पण अनेकदा त्यांना स्वतःलाच प्रश्न पडायचा, “हे लिहायचं तरी कसं?”
नंतर जेव्हा ते जम्मू आणि काश्मीर राज्याचे शिक्षण संचालक झाले, तेव्हा चौथीपासून मातृभाषेतून शिक्षण देण्याचे नवीन भाषा धोरण जाहीर झाले. ते सांगतात, “संगणकालाही अनुकूल अशी लिपी तयार करण्याची अगदी हीच योग्य वेळ होती,”
त्यांनी लिपी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि प्राथमिक स्तरावर एक पुस्तकही लिहिलं. पण काही खाजगी कारणास्तव त्यांची नोकरी सुटली आणि ते पुस्तक प्रकाशित करू शकले नाहीत. पण निवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा एकदा हे काम सुरू केलं आहे.

Muzamil Bhat

Muzamil Bhat
अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी तयार केलेलं ‘पुमिकी शिना किताब’ हे शिना लिपीचं पुस्तक चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित झालं. मात्र त्यावेळेसही शाळांमध्ये शिना भाषा विषय म्हणून ऐच्छिकच होता. “मी भाषाविषयक कार्यकर्ता झालो आणि निदान माझ्या भागात तरी शिना लिपीला एकसंध प्रमाणित असं रूप मिळालं,” ते सांगतात. अलीकडे मातृभाषेचं दस्तऐवजीकरण करण्याचे इतरही प्रयत्न झाले आहेत. श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठाच्या भाषा विभागाने शिना व्याकरणावर एक पुस्तक प्रकाशित केलं आहे.
मसूद म्हणतात की जोपर्यंत लिपी एकसंध किंवा प्रमाणित स्वरूपात तयार होत नाही, तोपर्यंत तरी शिना भाषेला प्राथमिक शिक्षणासाठी – किमान दहावीपर्यंत – अध्यापनाची भाषा म्हणून वापरणं गरजेचं आहे. ते पुढे हे देखील स्पष्ट करतात की सध्या तरी उच्चशिक्षण किंवा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांसारख्या तांत्रिक विषयांसाठी ती वापरता येणार नाही, पण या विषयात तातडीने लक्ष घालणं आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे, “नाहीतर ही भाषा लवकरच नष्ट होईल.”
गुरेझमध्ये नोकरीच्या काळात घडलेला एक किस्सा ते सांगतात. त्यांच्या कार्यालयात त्यांच्या समाजातील कोणी व्यक्ती जर काश्मिरी किंवा उर्दूत बोलत असे, तर ते त्या व्यक्तीला खडसावून सांगायचे, “मी तुमच्याशी शिना भाषेत बोलतो आहे, तुम्हीही त्याच भाषेत बोला!”
ते पुढे विचारतात, “आता तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाशी बोलायचं असेल, तर तुम्ही इंग्रजीत बोलाल का? एकही फ्रेंच माणूस घरी इंग्रजी बोलत नाही. हा 'इंग्रजीची गुलामी' करण्याचा मानसिक आजार केवळ आपल्याच भारतीयांमध्ये आहे.”
ते सांगतात की आजकालची मुले इंग्रजी शिकतात आणि परकीय भाषांमध्ये बोलण्यात त्यांची संपूर्ण बौद्धिक ऊर्जा खर्च होते. “असं काहीच नसतं की फक्त इंग्रज लोकंच हुशार असतात. मग आपण भारतीय लोक काय मूर्ख आहोत का? अर्थातच नाही. पण अडचण ही आहे कि आपण आपला जास्तीत जास्त वेळ परकीय भाषा शिकण्यामध्येच घालवतो, त्यामुळे आपल्या भाषांचा विकासच होत नाही,” ते ठामपणे सांगतात.

Muzamil Bhat

Muzamil Bhat

Muzamil Bhat

Muzamil Bhat
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार, इयत्ता पाचवीपर्यंतच शिक्षण मातृभाषेतूनच दिलं जावं, असं सूचित केलं आहे. “भारतीय शिक्षणक्षेत्रात झालेला हा कदाचित सर्वात शहाणपणाचा निर्णय आहे, पण याची अंमलबजावणी करणं फारच कठीण आहे,” असं मसूद म्हणतात.
शिक्षण मंडळाने काश्मिरी आणि डोगरी या भाषांमधील पहिलीच्या पाठ्यपुस्तकांसाठी याची अंमलबजावणी केली आहे. मसूद सांगतात की त्यांनी सुमारे एक वर्षापूर्वी शिना भाषेतील पुस्तक मंडळाकडे पाठवलं होतं, आणि आता ते त्याच्या प्रकाशनाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, मसूद आपल्या सहकाऱ्यांसह शिना लिपीला प्रमाणित व एकसंध करण्याचा प्रयत्न करत आहेत, “पण ही प्रक्रिया लवकर पूर्ण होईल असं मी खात्रीने सांगू शकत नाही. यासाठी खूप मेहनत लागते आणि मला वाटतंय की मी आता म्हातारा होत चाललो आहे,” असं ते चिंतेने सांगतात.
या लेखासाठी मदत केल्याबद्दल पत्रकार मसूद अल हसन समून, बशीर अहमद तेरू, फरीद अहमद लोन आणि अबरार-उल-आलम यांचे आभार मानतात.
गुलाम रसूल मुश्ताक यांच्या शिना कवितांचे अर्थ फरीद यांनी स्पष्ट केले असून, त्यांचे संपादन प्रतिष्ठा पंड्या यांनी केले आहे. मसूद अल हसन समून यांच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद मुजमिल आणि प्रतिष्ठा पंड्या यांनी केले आहेत.
पिपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (PARI) च्या ‘लुप्त होणाऱ्या भाषा प्रकल्पा’चा (ELP) हा भाग आहे आणि तो अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या सहकार्याने राबवला जात आहे. भारतातील असुरक्षित भाषांचे दस्तऐवजीकरण त्या भाषा बोलणाऱ्या लोकांच्या अनुभवांद्वारे व आवाजाद्वारे करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
हे वार्तांकन पारी सिनीअर फेलोशिप २०२५ च्या अंतर्गत प्रकाशित करण्यात आले आहे.
अनुवाद: जयेश जोशी
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/in-gurez-home-is-not-where-the-word-is-mr