“भूदानातून भिलाला समाजाला मिळालेल्या ३३ एकर शेतीवर गावातल्या बंजारा समाजाच्या लोकांनी बेकायदा ताबा घेतलाय, अशी तक्रार २९ ऑक्टोबरला गलसिंग यांनी केली होती. बंजारा समाजाच्या लोकांनी भूदानाच्या जमिनीवर झोपड्या उभारून ती बळकवायला सुरुवात केली होती. तक्रार झाल्यामुळे बंजारा समाजातील लोक भडकले. दोन दिवसांनी त्यांनी गलसिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गलसिंग गंभीर जखमी झाले. त्यांना इंदूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण महिनाभराने त्यांचा मृत्यू झाला. आम्ही प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली. मात्र गावातल्या दादा लोकांचा दबाव आणि राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई झालीच नाही,” जमिनीच्या कारणावरून दोन समाजांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाच्या आठवणी कल्लू भिलाला सांगत असतात. २०२४ साली गुणा जिल्ह्यामधल्या पनेहटी गावात ही घटना घडली. ज्या जमिनीपायी संघर्ष झाला, ती नेमकी कुणाच्या मालकीची; याबाबत स्पष्टता नाही. कल्लू भिलाला हे त्या संघर्षात जखमी झालेल्यांपैकी एक.
गलसिंग यांच्या मृत्यूची बातमी समजताच भिलाला आदिवासी आणि बंजारा समाज यांच्यात हिंसक संघर्ष उफाळून आला. या संघर्षात बंजारा समाजाची १० घरं जाळण्यात आली. दोन्ही समाजातली अनेक कुटुंबं बेघर झाली. भीतीपोटी अनेकांनी गाव सोडलं. कडक्याच्या थंडीत आभाळाच्या छताखाली रात्र काढायची वेळ त्यांच्यावर आली.
“आमच्या वाडवडलांना भूदान जमिनीचे पट्टे देण्यात आले होते,” २०२४ च्या सुरुवातीला जेव्हा भेट झाली होती तेव्हा गलसिंग भिलाला म्हणाले होते. तेव्हा त्यांचं वय होतं ४६ वर्षं. “साधारणपणे ५०-५५ वर्षांपूर्वी आमचे वाडवडील इथे स्थायिक झाले. ‘भूस्वामित्व पट्टा’ म्हणून ही जमीन ओळखली जाते. पण इतक्या वर्षानंतरही प्रत्यक्ष आणि कायदेशीरित्या आम्हाला या जमिनीचा मालकी हक्क मिळालेला नाही. अर्थातच या भागातल्या भिल, भिलाला आणि सहारिया आदिवासींसाठी हा अत्यंत ज्वलंत प्रश्न बनलाय. बमोरी तालुक्यातल्या अनेक आदिवासींच्या शेतजमिनींचा दादा लोकांनी बेकायदा ताबा घेतलाय.”
“भूदान योजनेअंतर्गत मिळालेले पट्टे गावाच्या ‘खसऱ्या’त (जमीन सर्वेक्षण क्रमांक) समाविष्ट आहेत,” गलसिंग भिलाला त्यावेळी सांगत होते, “त्या जमिनींवर इतरांनी बेकायदा ताबा घेतलाय. ना पटवाऱ्याने ना तहसीलदाराने; आजपर्यंत कुणीही आमच्या वाट्याची जमीन मोजून तिची स्पष्ट हद्द निश्चित करून दिलेली नाही.” महसूल अधिकाऱ्यांकडून जमिनीची मोजणी होऊन सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे या भागातल्या वेगवेगळ्या समाजांमध्ये सतत वाद आणि संघर्ष होतायत. अशाच एका घटनेत गलसिंग भिलाला यांनी आपला जीव गमावला. गलसिंग यांनी या घटनेआधी काही महिने ही वस्तुस्थिती सांगितली होती.
‘जमिनीची मालकी नेमकी कुणाची?’ हा गुंतागुंतीचा नि वर्षानुवर्षं धुमसत असलेला प्रश्न या सगळ्या संघर्षांच्या मुळाशी आहे. हा प्रश्न जेव्हा जेव्हा डोकं वर काढतो तेव्हा तेव्हा या भागात आदिवासीच आदिवासींना भिडतात. एवढंच नाही तर, आर्थिकदृष्ट्या फारसे सक्षम नसलेले इतर मागासवर्गीय (ओबीसी), जमीनदार, वन विभागाचे अधिकारी आणि राजकीय नेते यांच्याशीही त्यांचा संघर्ष अटळ होऊन बसतो.
आदिवासींच्या जमीनहक्काशी संबंधित संघर्षांचं दस्तऐवजीकरण या वार्ताहराने २०२२ पासून सुरू केलं. तेव्हापासून असे अनेक संघर्ष याने जवळून पाहिले आहेत. त्याचवर्षी मध्य प्रदेशमधल्या गुणा जिल्ह्यातल्या धनोरिया गावच्या रामप्यारी यांना त्यांच्याच शेतात सवर्ण समाजातल्या बड्या जमीनदारांनी जिवंत जाळून मारल्याची घटना घडली होती. या घटनेची पार्श्वभूमी वैशिष्ट्यपूर्ण होती. आपल्या जमिनीवर आपला हक्क प्रस्थापित व्हावा म्हणून रामप्यारी यांनी तब्बल २० वर्षं न्यायालयीन लढा दिला होता आणि तो हक्क मिळवला होता. जमिनीच्या हक्कावरून होणारे असे हिंसक संघर्ष रामप्यारी यांच्या मृत्यूपूर्वीही होत होते आणि आजही ते तितक्याच तीव्रतेने होतायत.















